छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून हा इतिहास आहे. त्यांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवावे आणि भाजपा मंत्र्यांनी माफी मागावी अशी महाराष्ट्राने मागणी केली आहे. या अवमानासंदर्भात भाजपा गप्प बसले असून ते इतर विषयांकडे लक्ष्य वळवीत आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. मंगळवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेल्या भूमिकेवर भाजपाने आक्षेप घेतल्यानंतर त्यावरून राऊतांनी भाजपाच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराज हे माफीवीर होते का? ते जुने-पुराणे नेते होते, आता त्यांचं महत्त्व नाही हे राज्यपालांचं विधान भाजपाला मान्य आहे का? यावर आधी उत्तर द्यावं. शिवाजी महाराजांचा अपमान हा सगळ्यात मोठा अपमान आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो आणि तिथेच संपतो. इतर राज्यांना भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. शिवाजी महाराज इथे जन्माला आले म्हणून हा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्राने राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यावर भाजपाने आपले मत आधी व्यक्त करावे. सुरुवात करायची आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या विषयापासून करावी लागेल. त्यावरून तुम्ही लक्ष दुसरीकडे वळवू शकत नाही”, असे संजय राऊत यांनी म्हटले.
“जे उद्योग एकावेळी दीड-दोन लाख रोजगार देऊ शकत होते, असे वेदांतासारखे उद्योग गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने तिथे पळवले, ज्यामुळे बेरोजगारीचा फटका हा सगळ्यात जास्त महाराष्ट्राला बसतोय”, अशा शब्दांत केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर टीका करताना राऊत म्हणाले.