देवरुखे ब्राम्हण संघाचा दसरा नवोत्सव संपन्न

मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (14:36 IST)
देवरूखे ब्राह्मण संघ डोंबिवली या संस्थेचं दसरा संमेलन ऑनलाईन पद्धतीने रविवार, दिनांक 1 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी संस्थेच्या फेसबुक पेजवर संपन्न झाले. 
 
नवीन पिढी आणि आपल्या परंपरा, या विषयावर केंद्रित असलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून इंदूर येथील साहित्यकार सौ अंतरा करवडे, उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांत जोशी यांनी प्रास्ताविक केले तर संस्थेचे उपाध्यक्ष श्री समीर निमकर व कार्यवाह श्री योगेश वीरकर यांनी संस्थेच्या झालेल्या व होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 
 
त्यानंतर प्रमुख पाहुण्या सौ अंतरा करवडे यांनी "आपल्या परंपरा व युवा पिढी" या विषयावर आपलं मनोगत सोप्या भाषेत विशद केले. आपण सांगितले, की नवीन पिढीपर्यंत या परंपरांचा आनंद पोचला पाहिजे, सक्तीने त्याचे पालन करणेच फक्त शिकवल्यावर हा प्रकार यंत्रवत होतो. एकीकडे नवीन पिढीला अपेक्षित असतं, की मोठ्यांकडे पूर्ण परंपरांची माहिती असावी त्याच प्रमाणे त्यांच्यावर विश्वास सुद्धा दाखवायला हवा. कर्त्या पिढीप्रमाणे नवीन पिढी ही परंपरांना सुद्धा कम्प्युटर प्रोसेसिंग प्रमाणेच बघत असेल, तर त्यांना इथे बदल करण्याची गरज आहे. 
 
विविध चित्राभिव्यक्ति आणि संवादात्मक प्रकारे झालेल्या या व्याख्यानात प्रत्येक प्रकारे समतोल साधणे आणि सर्वांनी सोबत चालण्याचा निर्धार ठेवावा, हे सर्वांनाच पटले. व्याख्यानानंतर संस्थेच्या कलावंतांनी नवोत्सव हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य अर्थातच नवरात्रातील प्रत्येक देवीचा दिवस, हा कोरोना काळात अविरत कार्य करणाऱ्या नवदुर्गेला समर्पित करण्यात आला. नृत्य, नाटिका आणि गीत संगीताने सजलेली ही मैफिल संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळातील सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करत साजरी केली.
 
या कार्यक्रमाची संकल्पना सौ तनुश्री वीरकर यांची होती. यात सर्व वयोगटातील अनेक कलाकार सहभागी झाले असून प्रत्येकाच्या कलागुणांना उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे यशस्वी संचालन वृषांक कवठेटकर यांनी केले असून सर्व तांत्रिक जबाबदारी शौनक पिंपुटकर यांनी सांभाळली. परिचय वाचन गौरव जोशी यांनी केले असून आभार प्रदर्शन अमेय पुराणिक यांनी केले आणि पसायदान मंजिरि पिंपुटकर यांनी सादर केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती