देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस करावे- नाना पटोले

रविवार, 16 मे 2021 (10:16 IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचे धाडस करावे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.
नाना पटोले यांनी म्हटलं, "देशाचे स्मशानभूमीत रुपांतर करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहावे. देशात आज दररोज चार लाखांहून अधिक रुग्ण आणि चार हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. या परिस्थितीला केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि गलथानपणा कारणीभूत आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत."
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 12 फेब्रुवारी 2020 रोजी कोरोना त्सुनामीसारखं संकट असल्याचा इशारा दिला होता. पण नरेंद्र मोदी यांनी ते गांभीर्याने घेतले नाही अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती