यंदा आषाढी पालखी सोहळा पायी होणार?

रविवार, 16 मे 2021 (10:13 IST)
आषाढी एकादशीसाठी पालखी सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे बसने नको तर पायीच व्हावा अशी आग्रही मागणी राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या संस्थानांनी केली आहे. यंदा वारीच्या पार्श्वभूमीवर व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे नुकतीच एक बैठक पार पडली.
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून वारीसाठी आषाढी एकादशीचा पालखी सोहळा पायीच व्हावा असा आग्रह संस्थांनी केला आहे. वारकऱ्यांची संख्या सरकार ठरवू शकतं पण पालखी सोहळा बसने नको अशीही भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.
जुलै महिन्यात पालखी सोहळा आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पालखी सोहळा बसमधून करण्यात आला होता.
 
संत तुकाराम महारज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी सांगितलं, की कोरोनाची कालमर्यादा कोणालाही माहीत नाही. कोरोना काळातच सध्या सर्व व्यवहार सुरू आहेत. यंदाचा पालखी सोहळा सरकारच्या नियमानुसार व्हावा. मात्र, तो पायी व्हावा अशी सर्वांची मागणी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
संत मुक्ताईंचा पालखी सोहळा 14 जूनला आहे. त्यापूर्वी शासनाने 1 जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करावी असं ठरल्याचंही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती