दुप्पट मदत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा; अजित पवारांचा हल्लाबोल

गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (09:21 IST)
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या  मंत्रिमंडळाने अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी घेतलेला निर्णय फसवा आणि जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारा आहे. यामुळे अतिवृष्टीग्रस्तांना कसलाही आधार मिळणार नाही. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा. अन्यथा अतिवृष्टीग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवण्यात येईल. तसंच एनडीआरएफचे निकष सुधारण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी सरकारला भाग पाडण्यात येईल, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.
 
दरम्यान, राज्यसरकारने विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीने झालेले पिकांचे, घराचे, शेतजमीनींचे नुकसान प्रचंड आहे. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने सरकारने दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना जराही दिलासा मिळणार नाही. कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार व बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आम्ही केली होती. ती मान्य न करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसण्याचे, त्यांना अधिक गाळात घालण्याचे काम केले आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर व्यक्त केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती