डेंग्यू संशयित रुग्णाचा मृत्यू ; १५ दिवसांत ५० वर रुग्ण आढळले...

गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (07:29 IST)
शहरातील कर्मयोगीनगरमध्ये एका डेंग्यू संशयित रुग्णाचा मृत्यू झाला. नागरिकांच्या आरोग्याचे, जीविताचे रक्षण करण्यासाठी प्रभागात डास निर्मूलन आणि स्वच्छता मोहीम राबवावी.
 
सर्व संबंधित विभागांना योग्य त्या सूचना देऊन आवश्यक उपाययोजना दोन दिवसांत कराव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे.
     
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांना याबाबतचे निवेदन बुधवारी, दि. २५ ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे. प्रभाग २४ मध्ये डेंग्यू, मलेरियासह साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. घरोघरी रुग्ण तापाने फणफणले आहेत. गोविंदनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, जुने सिडको, उंटवाडी, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसर यासह संपूर्ण प्रभाग २४ मध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडी, ताप, डेंग्यू, मलेरियासह विविध आजारांनी थैमान घातले आहे.
 
रविवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी कर्मयोगीनगरमधील एका डेंग्यू संशयित रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत सुमारे पन्नासहून अधिक डेंग्यूचे रुग्ण पंधरा दिवसांत आढळले आहेत. यापूर्वी सोमवारी, दि. २३ ऑक्टोबर रोजी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांना निवेदन दिल्यानंतर बुधवार, दि. २५ ऑक्टोबरपासून डास प्रतिबंधक औषध फवारणी सुरू झाली आहे. संपूर्ण प्रभागात डास निर्मूलन मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
दोन दिवसांत याबाबत कार्यवाही न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, चारुशीला गायकवाड, बाळासाहेब मिंधे, धवल खैरनार, संगीता देशमुख यांनी दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती