Nashik News : प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाची हत्या, दोघे अटकेत

शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (21:52 IST)
मयत युवकाचे आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून वडाळी नजीक येथील रोशन ज्ञानेश्वर झाल्टे (वय 22) या युवकाचा दोघा तरुणांनी जबर मारहाण करून खून करून त्याचा मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा मात्र पोलिसांनी मयताचा भाऊ अतुल झाल्टे याच्या तक्रारीवरून आरोपी ऋषिकेश ऊर्फ शंतनू मुकुंद घुमरे (वय 23, रा. उंबरखेड रोड, पिंपळगाव बसवंत) आणि एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी ऋषिकेश घुमरे (वय 23) आणि मयत रोशन झाल्टे (वय 22) हे नात्याने एकमेकांचे चुलत मामेभाऊ आहेत. रोशनचे आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध आहेत, या संशयातून ऋषिकेश ऊर्फ मुकुंद घुमरे याने विधिसंघर्षित बालकांच्या मदतीने रोशनच्या डोक्यात घातक हत्याराने मारून त्याला गंभीर जखमी केले आणि जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने रोशनला दोरीने दगड बांधून साकोरे शिवारातील कालिया एक्स्पोर्ट कोल्ड स्टोअरेजच्या मागे असलेल्या रमेश शंकरराव कोतवाल यांच्या शेतातील विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
 
या प्रकरणी पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती; मात्र मयत रोशनचा धाकटा भाऊ अतुल ज्ञानेश्वर झाल्टे (रा. वडाळी नजीक) याने पोलिसांकडे हत्येचा संशय व्यक्त केला. पुढील तपासात हा संशय खरा ठरला. या हत्येप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक ए. के. पवार हे करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती