लाचखोर मुख्याध्यापिकेसह उपशिक्षीका अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात

बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (21:44 IST)
मालेगाव  घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी १२५० रुपयांची लाच मागणाऱ्या लाचखोर मुख्याध्यापक आणि उपशिक्षीकेला अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडले आहे. शहरातील सोयगाव येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या जागृती विद्यालयात कार्यरत असलेला मुख्याध्यापक राहुल प्रकाश मोराणकर आणि उपशिक्षीका मनिषा सुदाम चव्हाण यांना एसीबीने लाच घेताना पकडले आहे.
 
महापालिका हद्दीत असल्याने पगारवाढ आणि घरभाडे भत्ता लागू व्हावा, असा अर्ज करण्यात आला होता. त्यास मंजुरी देण्यासाठी  मोराणकर आणि चव्हाण यांनी १२५० रुपयांची लाच मागितली. यासंदर्भातील तक्रार एसीबीला मिळाली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. या सापळ्यात मोराणकर आणि चव्हाण हे १२५० रुपये घेताना पकडले गेले. याप्रकरणी मोराणकर आणि चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, लाच घेणे आणि देणे हा गुन्हा असून याप्रकरणी तक्रार देण्यासाठी १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती