राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करून पैसे मागितले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमोल कोल्हे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली असून त्यांनी काही स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी फेक अकाऊंटचा एक स्क्रिनशॉट शेअर करत माहिती देखील दिली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, “@kdr.amol या नावाने Instagram profile बनवून लोकांना मेसेज पाठवले जात आहेत आणि पैशाची मागणी केली जातेय. फोटो नाव सेम दिसत असलं तरी या फेक प्रकारापासून सावध रहा. माझ्या व्हेरिफाईड अकाउंटचं इंस्टा युझरनेम @amolrkolhe असं आहे. @kdr.amol या फेक प्रोफाईल संदर्भात रितसर तक्रार केलेली आहे.” असं लिहित डॉ. अमोल कोल्हे सर्वांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
खरंतर, अमोल कोल्हे यांच्या नावाने एक फेक अकाऊंट तयार करून त्यावरून 20000 रूपये ऑनलाईन पाठवण्याची मागणी केल्याचं दिसत आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी ही पोस्ट शेअर करत सर्वांना अशा फ्रॉड प्रकारापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.