कोरोना : मॅरेथॉनपटू लता करे यांची पतीला वाचवण्यासाठीची धाव कोरोनाने रोखली

शुक्रवार, 7 मे 2021 (19:16 IST)
लता करे. हे नाव कदाचित तुम्हाला आठवत असेल. वयाची पासष्टी ओलांडली तरी लता करे विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी व्हायच्या. लता यांचे पती भगवान करे यांच्यावर ह्दयविकाराचे उपचार सुरू होते.
 
भगवान यांच्यावरील उपचाराचे पैसे जमा करण्यासाठी लता करे शरीरातलं सगळं बळ एकवटून धावायच्या. पण आता मात्र लता करे पुन्हा धावताना दिसणार नाहीत. कारण त्यांच्यासाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचं कारणच आता उरलेलं नाही. लता करे यांचे पती भगवान यांचं बुधवारी (5 मे) कोरोनामुळे निधन झालं आहे.
 
भगवान करे यांचं कोरोनाने निधन झाल्याची माहिती समोर येताच राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लता करे यांचे पती भगवान करे यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लक्षणं दिसून येऊ लागली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भगवान यांना बारामती कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अखेर बुधवारी (5 मे) भगवान यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
पतीला हृदयविकारातून वाचवलं
मॅरेथॉनपटू लता करे यांचा '2013 बारामती मॅरेथॉन स्पर्धे'त पहिला क्रमांक आल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. पतीच्या उपचारासाठी वयाच्या 65 व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांनी मिळवलेल्या विजयानंतर सर्वत्र कौतुक झालं होतं.
 
पण, आपल्या वाढत्या वयाचा विचार न करता लता करे स्पर्धांमध्ये सहभागी होत होत्या. बारामती शहर मॅरेथॉन स्पर्धेत सलग तीन वर्षं प्रथम क्रमांक पटकावण्याची कामगिरी लता करे यांच्या नावावर आहे. लता करे यांच्या या कामगिरीतून त्यांनी आपल्या पतीवरचं प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग शोधला होता.
 
बारामती स्पर्धेप्रमाणे इतर काही स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून लता करे यांनी पुरस्काराची रक्कम पतीच्या उपचारासाठी जमा केली होती. तसंच, तिसऱ्या वर्षी त्या आपलं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावल्या होत्या.
लता करे यांचं कुटूंब मूळचं बुलडाणा जिल्ह्यातलं. आपल्या गावी उत्पन्नाचं कोणतच साधन उपलब्ध नसल्याने त्यांनी बारामतीत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुमारे 9 वर्षांपूर्वी लता करे कुटुंबासह बारामतीत वास्तव्यास दाखल झाल्या होत्या.
 
लता करे यांची मुलाखतही बीबीसी मराठीने घेतली होती. यामध्ये त्यांनी आपल्या मॅरेथॉन विजयाचं वर्णन अतिशय भावनिक होऊन केलं होतं. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं, माझे मालक आजारी पडले होते. डॉक्टरांनी MRI करायला सांगितलं. त्यासाठी पाच हजार रुपये लागणार होते. तेवढ्यात मॅरेथॉन स्पर्धेबाबत माहिती मिळाली.
त्या सांगतात, रनिंग कशी असते तेही माहीत नव्हतं. पहिला नंबर आला पाहिजे, हीच जिद्द माझ्या मनात होती. तो विचार करूनच धावले. लोकांनी माझ्या नावाची घोषणा केल्यावरच माझ्या जीवात जीव आला.
 
मॅरेथॉनपटू लता करे यांची कहाणी त्यांच्या चित्रपटातूनही समोर आली आहे. 'लता भगवान करे,एक संघर्षकथा' असे या चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे करे यांनीच त्यांची मुख्य भूमिका चित्रपटात साकारली आहे.
 
दाक्षिणात्य निर्माते ए. कृष्णा अरुबोधु यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर नवीन देशबोईना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. करे यांच्या आयुष्यावर आधारित आधारीत मराठी चित्रपटास 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार मार्च 2021 मध्ये जाहीर झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती