लॉकडाऊन असतानाही गर्दी झाल्याने ती रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने तुफान दगडफेक करीत पोलिसांनाच पळवून लावले. तसेच राज्य राखीव पोलीस दलाचा तंबुही उखडून टाकला. जमावाने काही खासगी वाहनांचीही तोडफोड केली आहे. ही घटना संगमनेरमधील तीन बत्ती चौकात घडली. या घटनेने संगमनेर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
तीन बत्ती चौकातील हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. गर्दीतील बहुतेकांनी मास्क घातलेले नव्हते़. त्यामुळे गस्ती पथकातील राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी या गर्दीला तेथून हटविण्याचा प्रयत्न सुरु केला. तेव्हा जमावातील काही जणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी शंभर ते दीडशे जणांचा जमाव जमला होता. आपल्या दिशेने जमाव चालून येत असल्याने पाहून पोलीस तेथून पळून गेले. तीन बत्ती चौकातील लिंबाच्या झाडाखाली निवार्यासाठी पोलिसांनी ठोकलेला तंबु जमावाने उखडून रस्त्यावर फेकून दिला. जमावाने काही खासगी वाहनांचेही नुकसान केले.
या घटनेनंतर पोलिसांनी जादा कुमक मागवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. जुबेर हॉटेलचा चालक, तेथील सर्व कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीरखान, मोहम्मद हनीफ रशीद शेख, अरबाज शेख या आरोपींसह १० ते १५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.