काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका आणि भाजपवर टीका केली. काँग्रेस हा एकसंघ पक्ष आहे. काँग्रेसमध्ये कुठेही वाद नाही. आम्ही सर्व एक आहोत, असा संदेश मी सातत्याने देत होतो. परंतु नागपूर आणि अमरावतीच्या निवडणुका हरल्यानंतर ज्यापद्धतीने भाजपाच्या वतीने एक वातावरण काँग्रेसबद्दल निर्माण करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. काँग्रेसमध्ये विभाजन आहे, अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात उभारण्यात आलं होतं, असं नाना पटोले म्हणाले.मुंबईत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली.
कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प या बैठकीत झाला आहे. एकजुटीने आमची पूर्ण कार्यकारिणी या दोन्ही विधानसभेत जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा प्रचार करणार आहेत. काही ठरावही आम्ही त्यामध्ये केले आहेत. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली. त्याचा सार्थ अभिमान काँग्रेसला आहे, असं नाना पटोले म्हणाले.