मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

शनिवार, 9 जुलै 2022 (18:41 IST)
फोटो साभार -ट्विटर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा यांच्या भेटी घेतल्या. आम्ही शिवसेना आणि भाजप युती करून निवडणुका लढवल्या होत्या. लोकांच्या मनात होतं त्याप्रमाणे युतीचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. त्यानंतर वरीष्ठ नेत्यांच्या भेटीला आम्ही आलो आहोत.

हे सरकार लोकांचं आहे. लोकांच्या हिताचं जपणूक करणार आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारं हे सरकार आहे. आता पंतप्रधानांना भेटून राज्याच्या विकासात त्यांचं व्हिजन आम्ही समजून घेणार आहोत. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. या भेटीनंतर राज्याच्या प्रगती आणि विकासासाठी केंद्र शासनाच्या सहकार्य आणि भक्कम पाठिंबा मिळून महाराष्ट्राचा विकास होण्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  
 
महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनानंतर नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेते दिल्लीत सातत्याने केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या सगळ्यात दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस चांगलेच खूश दिसत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची ही पहिलीच भेट आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
 
याआधी शुक्रवारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शहा यांच्याशी झालेल्या चर्चेत भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील सत्तावाटपाच्या सूत्राभोवतीच चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. शिंदे आणि फडणवीस यांनी 30 जून रोजी पदभार स्वीकारला. शिंदे आणि त्यांच्या गटातील 15 आमदारांना अपात्र ठरवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 11 जुलै रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.  
 
एकनाथ शिंदे यांनी शनिवारी आपला कार्यकाळ पूर्ण करून पुढील निवडणूक भारतीय जनता पक्षासोबत युती करून जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत संबोधित करताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पुढील आठवड्यात मुंबईत निर्णय घेतला जाईल.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती