नाशकात दम’धार’पाऊस; धरणसाठ्यात वाढ

शनिवार, 9 जुलै 2022 (15:11 IST)
नाशिकमध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाली आहे. जून महिन्यात दांडी मारलेल्या पावसाने काल सकाळपासून जोरदार हजेरी लावली त्यामुळे गंगापूर, दारणा (, भावली आणि पालखेड या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात बहुतांश धरणात पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शहराला पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार असल्याची देखील चर्चा सुरू होती. मात्र, काल झालेल्या दमदार पावसामुळे गंगापूर, दारणा, भावली  आणि पालखेड या धरणांतील पाणीसाठा वाढला असून नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.
 
गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ
नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात पाण्याने तळ गाठला होता. ३० जुलैपर्यंत पुरेल एवढंच पाणी धरणात शिल्लक होतं. त्यामुळे येत्या सोमवारी पाणी कपातीचा निर्णय होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे गंगापूर धरण ३७ % भरलं आहे. त्यासोबतच दमदार पावसामुळे दारणा धरणाची देखील पाणी पातळी वाढली असून धरण ४४ टक्के भरल्याने मोठा दिलासा मिळत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती