आषाढीच्या आदल्या दिवशी पंढरी भूकंपाने हादरली

शनिवार, 9 जुलै 2022 (15:04 IST)
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून निघालेल्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंढरी नगरी भक्तीरसात बुडाली आहे.
अशातच आज पहाटे निसर्गाने धक्का दिला आहे. पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात पहाटे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.सकाळी ६.२२ च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
कर्नाटकतील विजापूरपासून दहा किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्रबिंदू होते. तेथे भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी होती. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. मात्र, यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. पंढरपूरची यात्राही सुरळीत सुरू आहे.
सोलापूर शहरातील रामवाडी परिसरात सौम्य धक्के जाणवले
आज सकाळच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. सुरुवातीला नेमकं काय सुरु अशी लोकांना गडबड जाणवली होती. त्यानंतर भूकंप झाल्याची माहिती लोकांना मिळाली आहे. सोलापूरपासून काही अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यात विजयपूर येथे भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी 4.9 रिस्टर स्केल भूकंप झाल्याची नोंद झाली आहे.  अद्याप कोणत्याही प्रकारची जिवितहाणी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.  सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातील लोकांना सौम्य धक्के लागल्याची त्यांनी माहिती दिली आहे. भूकंप झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कुठे काय घडलं आहे का ? याची चौकशी केली जात आहे. राज्यात मागच्या काही दिवसात अतिवृष्टी झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती