शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकाहून एक खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केलं असल्याचं कालच समोर आलं. पैसे घेऊन टीईटी परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झालं आहे.
खोडवेकर हे या पूर्वी शिक्षण विभागात कार्यरत होते. खोडवेकर यांनी शिक्षक भरती परीक्षेत घोटाळा केल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे. हा घोटाळा कसा झाला? याची माहिती खोडवेकर यांच्याकडून पोलीस काढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या घोटाळ्यात आणखी कोणते बडे मासे हाती लागतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या घोटाळ्यातील खोडवेकर यांच्या सहभागाबाबतची विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही.
पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक केली आहे. सुशील खोडवेकर हे आयएएस अधिकारी आहेत. ते शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून कार्यरत होते. सायबर पोलिसांनी शिक्षक भरती घोटाळ्याची पाळंमुळं खोदून काढण्यास सुरुवात केली असून खोडवेकर यांना अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज पर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.