कागदी पिशवीचे पैसे आकारणे दुकानदाराला पडले महाग

बुधवार, 27 जुलै 2022 (15:27 IST)
संभाजीनगर(औरंगाबाद )- लोगो असलेली पिशवी ग्राहकाला विकणाऱ्या चिकलठाणा येथील प्रोझोन मॉलमधील मॅक्स फॅशन लाइफस्टाइलला जालना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दुकानदाराची ही कृती अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब ठरते. ती त्यांच्या सेवेतील कमतरता आहे, असा निष्कर्ष काढत जालना येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मॅक्स् रिटेलला ग्राहक अश्विनी धन्नावत यांना नुकसान भरपाई म्हणून 2 हजार रुपये द्यावेत, असे आदेश दिले आहेत. तसेच कागदी पिशवीसाठी घतलेले सात रुपये देखील परत करण्यास सांगितले आहे.

जालना येथील रहिवासी वकिल अश्विनी महेश धन्नावत यांनी 21 डिसेंबर रोजी प्रोझोन मॉलमधील मॅक्स रिटेलमध्ये जाऊन काही साहित्य खरेदी केले होते. त्याचे बिल देताना त्यांना कंपनीचा लोगो असलेली कागदी पिशवी देण्यात आली आणि बिलात पिशवीचे 7 रुपये लावण्यात आले. मॅक्स रिटेलची ही कृती बेकायदेशीर असून त्यांनी भविष्यात असा प्रकार इतर ग्राहकांसोबत करु नये म्हणून अश्विनी धन्नावत यांनी अ‍ॅड्. महेश धन्नावत यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल करुन 15 हजार रुपाये नुकसान भरपाई मागितली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती