ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (19:03 IST)
ऐन दिवाळीत पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 2 नोव्हेंबरनंतर चार ते पाच दिवस पावसाची स्थिती राहील, असे हवामान खात्याने सांगितले. 
 
दक्षिण आणि पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. पट्टी तयार झाल्यास 2 ते 10 नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता कमी आहे. तो पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 6 ते 11 नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातील काही भागात पाऊस सक्रिय होईल, मात्र महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मराठवाड्यात किमान तापमान सरासरी आहे. विदर्भातील अमरावती आणि ब्रह्मपुरी गोंदिया भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याने रात्री गारवा जाणवत आहे.
 
अनेक शेतकरी कापणीला सुरुवात करणार आहेत. असा पाऊस झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडला तर हवेत अधिक गारवा जाणवेल. अहमदनगर आणि जळगाव वगळता मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. कोकणात मुंबई परिसरातील सरासरीपेक्षा 1 अंशाने जास्त आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती