अजित पवार, अनिल परब यांची CBI चौकशी करा,' चंद्रकांत पाटलांचं अमित शाहांना पत्र
बुधवार, 30 जून 2021 (22:15 IST)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर बेकायदेशीरपणे पैसे गोळा करण्याचा आरोप केला आहे, तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार,अनिल परब,आणि दर्शन घोडावत यांची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केलीये.
राज्यात तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे हे तुम्हाला माहीत आहे. या तीन पक्षांमधल्या राजकीय दबावामुळे आणि सत्तेच्या गैरवापरामुळे राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रात काय म्हटलं आहे?
चंद्रकांत पाटील यांनी पोलीस निरीक्षक सचिन वाझेंनी जबाबात दिलेल्या माहितीच्या आधारे अजित पवार, अनिल परब आणि दर्शन घोडावत यांच्यावर आरोप केले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रात मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे-
सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते. 2004 मध्ये त्यांचं निलंबन केलं होतं. 2020ला त्यांच्याबाबत प्रतिकूल मत असूनही त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं. वाझे यांना एनआयएने मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी अटक केली आहे. ते सध्या कोठडीत आहेत.
चौकशीत सचिन वाझे यांच्यावर मनसुख हिरेन यांच्या हत्येचासुद्धा आरोप आहेत. चौकशीदरम्यान सचिन वाझे यांनी इतर गुन्हे सुद्धा उघडकीस आणले आहेत. 3 एप्रिल 2021 ला एनआयएच्या कोर्टात सचिन वाझे यांनी हस्तलिखित खुलासा सादर केला आहे. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर झालेली चर्चा सविस्तर सांगितली आहे.
सचिन वाझे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. अजित पवार यांनी दर्शन घोडावत यांच्या मार्फत अवैध गुटखा विक्रेत्यांकडून आणि उत्पादकांकडून बेकायदेशीरपणे 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले.
परिवहन मंत्री अनिल परब यांनीही वाझे यांना मुंबई महापालिकेच्या 50 कंत्राटदाराकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले,
अनिल परब यांनी सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट विरोधात चौकशी करण्यास सांगितलं होतं. त्यांना त्रास देऊन 50 कोटी जमा करण्यास सांगितलं होतं.
अनिल देशमुख यांची सध्या सीबीआय चौकशी सुरू आहे. या सर्व आरोपांमध्ये लाच घेण्याचा हेतू स्पष्ट होतो.