राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार?

मंगळवार, 3 मे 2022 (15:28 IST)
औरंगाबादमधल्या सभेत कायदा मोडल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
 
"आम्ही अशा केसेसला घाबरत नाही. आम्ही 16 वर्षं असा संघर्ष करत आहोत. उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या नोटीसा देण्यात आल्या आहेत. आम्ही आंदोलन करणारच," असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.
 
राज्यात आतापर्यंत13 हजारांना कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यात आलीये. राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत भोंग्यासंदर्भात अल्टिमेटम दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या नोटीसा दिल्या आहेत.
 
राज ठाकरेंनी काय म्हटलं होतं?
1 मे रोजी राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती.
 
या सभेत बोलताना राज ठाकरेंनी म्हटलं, "4 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत, तर माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावावी."
 
"जर सरळ सांगून समजत नसेल तर कठोर पावलं उचलावीच लागतील," असं राज ठाकरेंनी म्हटलं.
 
राज ठाकरे यांच्या सभेच्या वेळी अजान सुरू झाली. त्यांमी म्हटलं की, सभा सुरू असतानाच लाऊडस्पीकरवरून बांग ऐकू येत आहे. पोलिसांनी हे भोंगे तत्काळ थांबवावेत असं राज ठाकरे म्हणाले.
 
जर सरळ सांगून कळत नसेल तर एकदाच जे व्हायचं ते होऊ द्या, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती