राज ठाकरेंच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला; ‘हे’आहे कारण

मंगळवार, 3 मे 2022 (15:20 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली असून या बैठकीत भोंगे (Loudspeaker), महाआरती आणि हनुमान चालीसा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच याबाबत पक्षाची नेमकी भूमिका काय असेल ते पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ही बैठक (Meeting) बोलवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला निवडक पदाधिकारी आणि नेते उपस्थित असणार असून या बैठकीनंतर राज ठाकरे आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.
 
औरंगाबाद येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी पोलिसांना दिलेल्या ४ मे रोजीच्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार केला. त्यानंतर राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मशिदीवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंगे न हटवल्यास ४ मे पासून कार्यकर्त्यांनी मशिदीसमोरच दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावावी, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गृहखात्यातही या प्रश्नावर गंभीरपणे चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नेमका काय निर्णय जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती