पण निवडणूक आयोग हा काही अंतिम नव्हे, आम्ही न्यायालयीन लढा लढणार आहोत : सुषमा अंधारे

शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (21:18 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “ससंदीय लोकशाहीमध्ये अहस्तक्षेपाचं तत्व आणि सत्तेचे विकेंद्रीकरण या दोन महत्त्वाच्या आधारशीला असतात. भाजपाच्या दंडेलशाहीच्या राजकीय कारकिर्दीत मात्र या दोनही तत्त्वांना हरताळ फासण्याचं आणि या आधारशीला खिळखिळ्या करण्याचे काम सातत्याने सुरु आहे. निवडणूक आयोगाने आज दिलेला निकाल हा बघण्याच्या आधी मागील तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी तिघांच्या प्रतिक्रिया तपासून पाहिल्या तर सर्वच स्पष्ट होईल.”
 
हे तीनही नेते धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, निकाल आमच्याच बाजूने लागणार, कोऱ्या स्टँप पेपरवर लिहून घ्या, अशा वल्गना करतात. याचाच अर्थ स्वायत्त यंत्रणामध्ये काय पद्धतीने हस्तक्षेप झालेला आहे, हे चित्र स्पष्ट होत आहे. पण निवडणूक आयोग हा काही अंतिम नव्हे. आम्ही न्यायालयीन लढा लढणार आहोत. प्रतिकांच्या राजकारणापेक्षा मुल्यधिष्ठीत राजकारण मोठे असते. शिवसेनेचे अधिष्ठान हे सेना भवन, मातोश्री आणि सन्मानीय ठाकरे या नावांमध्ये आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती