कोल्हापूर जिल्हय़ातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात लव्ह जिहादचा प्रश्न पेटला आहे.अशा प्रकरणांत पिडीतेसह तिच्या कुटुंबाला संरक्षण कोण देणार, हा प्रश्न आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्रातही लव्ह जिहादचा कायदा आणावा, यासाठी पाठपुरावा करत आहोत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पेले.
पेंडस ऑफ बीजेपी उपक्रमांतर्गत त्यांनी बुधवारी सकाळी ऍड. राजू किंकर, दिलीप सावंत यांच्या घरी भेट दिली. अंबाबाई मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर त्या बिंदू चौकातील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शौमिका महाडीक, शहराध्यक्षा गायत्री राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, राज्य कार्यकारिणी सदस्य महेश जाधव उपस्थित होते.
चित्रा वाघ म्हणाल्या, कोल्हापुरात यापुर्वी घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाची माहिती आहे. पण चार दिवसांपुर्वीचे प्रकरण गंभीर आहे. पोलीस पिडीतेच्या वडिलांना ताटकळत ठेवत असतील, तर ही बाब गंभीर आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसुर करणाऱयांना पाठीशी घातले जाणार नाही. लव्ह जिहादचा प्रश्न संपुर्ण राज्यात आहे. जाणीव नसल्याने 14-15 व्या वर्षी मुली प्रेग्नंट रहात आहेत. अशा घटनांत पिडीत मुलीसह तिच्या कुटुंबाला संरक्षण देणारा कायदा राज्यात नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा आणावा, यासाठी आपण आग्रही राहणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
राज्यात लवकरच आणखी एक शक्ती कायदा
राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी शक्ती कायद्याची मागणी केली आहे. पण राज्यात विरोधी सरकार असतानाही शक्ती कायद्यासाठी भाजपने सुरूवातीपासून सकारात्मक भुमिकाच घेतली आहे. भविष्यात महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात आणखी एक शक्ती कायदा येणार आहे. त्यामुळे भाजप महिला मोर्चावरील जबाबदारी वाढणार आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण आग्रही भमिका घेणार आहोत.राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने 125 दिवसांत लोकाभिमुख सरकार म्हणून चांगले काम केले आहे. राज्य सरकारच्या अजेंडय़ावर महिला सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. महिलांवरील ऍसिड हल्ल्यासह अन्य अत्याचारांना आळा घालण्यासाठी पोलीस 100 टक्के काम करत आहेत. सरकार 110 टक्के काम करत आहे. पण नागरिकांची म्हणून सोशल रिस्पॉन्सिबिलीटी, सामाजिक जबाबदारी ही खूप महत्वाची आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीवजागृती होण्यासाठी भाजप महिला मोर्चा लवकरच जनजागृती चळवळ हाती घेणार आहे.