मेट्रोच्या विलंबाबद्दल मुंबईकरांची माफी मागा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

गुरूवार, 31 मार्च 2022 (21:31 IST)
येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या २ ए आणि मेट्रो ७ या टप्प्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारे उद्घाटन म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या आहेत. या प्रकल्पाचे ६० टक्क्यांहून अधिक काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झाले असतानाही मुंबईकरांना वेठीस धरूने उर्वरित कामास तब्बल तीन वर्षे विलंब लावल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यावेळी उपस्थित होते.  
 
गेल्या वर्षी ३१ मे रोजी या मार्गावरील मेट्रो रेल्वेची चाचणी पूर्ण झाल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर अपुऱ्या सुविधांनिशी मेट्रो सुरू करणारे ठाकरे सरकार म्हणजे आयत्या उभारलेल्या गुढीची पूजा करण्यासाठी उपटलेला अनाहूत यजमान आहे, अशी बोचरी टीकाही उपाध्ये यांनी केली. अजूनही या मार्गावरील स्थानकांची कामे पूर्ण झालेली नाहीत. ज्या ठिकाणी शनिवारी या कामाचे उद्घाटन होणार आहे तेथे अजूनही जिन्याची कामेदेखील अर्धवट अवस्थेत आहेत. फडणवीस सरकारच्या काळातील विकासकामांची गुढी उभारण्यासाठी पुढे येऊन ठाकरे सरकारने आपले नाकर्तेपण सिद्ध केले आहे, असे उपाध्ये म्हणाले. ऑक्टोबर २०१९ मध्ये या मार्गावर मेट्रो धावणार असे अगोदर एमएमआरडीने जाहीर केले होते. शिवसेनेने मतदारांचा विश्वासघात करून सत्ता काबीज केल्यानंतर ही मुदत डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली. पण या मुदतीतही प्रकल्पाची कार्यवाही करून दाखविता आली नाही. तब्बल तीन वर्षे विलंबाने ही मेट्रो सेवा सुरू करून ठाकरे सरकारने मुंबईकरांनी वेठीस धरण्याचे काम ‘करून दाखविले’ आहे, असा टोला उपाध्ये यांनी मारला.
 
श्री. उपाध्ये यांनी सांगितले की, शिवसेनेची रसातळाला गेलेली प्रतिमा सावरण्याकरिता फडणवीस सरकारच्या कामाचे श्रेय घेण्याची मुख्यमंत्री ठाकरे यांची धडपड मुंबईकरांनी ओळखली आहे. या मेट्रोच्या कामाला तीन वर्षे विलंब करून दाखविल्यानंतर त्याच्या उद्घाटनाचे श्रेय घेऊन स्वतःचीच पाठ थोपटून घेणाऱ्या ठाकरे सरकारने मेट्रोची अडवणूकच केली. केवळ अहंकार आणि हट्ट या पायी मेट्रो कारशेड प्रकल्पास स्थगिती देऊन मुंबईकरांची ही सुविधा वेठीस धरणाऱ्या ठाकरे सरकारने आपल्या कर्तबगारीवर आखलेला आणि पूर्ण केलेला एक तरी विकास प्रकल्प दाखवावा, असे आव्हानही उपाध्ये यांनी दिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती