बेळगाव -बुडाने निर्माण केलेल्या वसाहतींमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करण्यासह विकासकामे राबविण्याकरिता निधीची चणचण भासत आहे. त्यामुळे बुडाच्या मालकीचे भूखंड विक्री करण्यासाठी ऑनलाईन लिलाव प्रक्रिया राबविली आहे. 101 भूखंडांकरिता नागरिकांनी बोली लावली आहे. तब्बल 3850 रुपये चौरस फूट दराने बोली लावण्यात आली.
बुडाने ठिकठिकाणी रहिवासी वसाहती निर्माण केल्या आहेत. या वसाहतींमध्ये बुडाच्या मालकीचे भूखंड शिल्लक आहेत. सध्या बुडाच्या वसाहतीमध्ये विविध विकासकामे राबविण्याची गरज आहे. तसेच कणबर्गी योजनेतील विकासकामे राबविण्यासाठी 200 कोटी निधीची आवश्यकता आहे. पण सध्या बुडाकडे निधी उपलब्ध नसल्याने बुडाच्या भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार लक्ष्मी टेकडी येथील बुडा योजनेतील 1, कणबर्गी येथील 70 भूखंड, राणी चन्नम्मानगर येथील 1 आणि कुमारस्वामी लेआऊटमधील 29 भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन लिलाव प्रक्रिया राबविली होती. 50 हजार रुपये भरून या प्रक्रियेत सहभाग घेण्याची मुभा होती. 101 भूखंडांकरिता नागरिकांनी बोली लावली आहे. भूखंडांना बुडाच्या अपेक्षेप्रमाणे दाम मिळाला असून बुडाने 2600 रुपये प्रतिचौरस फूट दर निश्चित केला होता. पण लिलावावेळी 3850 रुपये दराने बोली लावण्यात आली असून 101 भूखंडांना बोली लावण्यात आली आहे.