मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, राज ठाकरे महायुतीमध्ये येत असतील तर आनंदच आहे. इंडिया आघाडीमध्ये देखील कितीतरी पक्ष आहेत. राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर महायुतीची शक्ती वाढेल कमी होणार नाही. याचा फायदा विधानसभा आणि मनपाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा होईल. कोणाची ताकद किती आहे हे मला माहिती नाही. कोणाला तरी बरोबर घायाचे आहे तर जागा द्याव्या लागतील.
जागावाटपावर छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, जागा वाटप हळूहळू होतायत. २० मे रोजी नाशिकची निवडणूक आहे. त्यामुळे अजून वेळ आहे. पाच टप्प्यात निवडणुका आहेत. त्यामुळे जागावाटप हळूहळू होत आहे. काही ठिकाणी निवडणुकांसाठी खूप वेळ आहे. मोदी साहेबांना परत पंतप्रधान म्हणून पुन्हा बसवायचे आहे. त्यामुळे वरून आदेश आले तर सगळे शांत होतील. १० वर्षात हेमंत गोडसे यांनी काहीच केले नाही असे भाजप पदाधिकारी म्हणत असतील तर त्यावर नेते बघतील, असे त्यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस जोपर्यंत शिवसेनेबरोबर होता तोपर्यंत कोणी काही बोलले नाही. शिवसेना आणि भाजप एकच हिंदूत्वाचा विचार आहे. शिवसेनेचं हिंदुत्व चालत मग भाजपचं का नाही? आम्ही फक्त युती केली. भाजपमध्ये विलीन झालो नाही, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारावर चालणार पक्ष आमचा पक्ष वेगळा आहे, असेही भुजबळांनी सांगितले.