बेळगाव जिल्ह्याचे त्रिभाजन होणार

शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (08:17 IST)
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचा तीन जिल्ह्यांत विभाजनाचा प्रस्ताव असून गोकाक आणि चिक्कोडी या दोन नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर असल्याचं पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितलं आहे. बेळगाव जिल्ह्याचा विस्तार मोठा असून प्रशासनाच्या सुलभीकरणासाठी हा प्रस्ताव असल्याचं ते म्हणाले. तसेच बेळगाव तालुक्याचेही दोन तालुक्यांमध्ये विभाजन करण्याचा प्रस्तावही असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
बेळगाव जिल्ह्याचा आकार हा मोठा असून प्रशासकीय दृष्टीकोनातून लोकांच्या गैरसोयीचा असल्याची तक्रार अनेकदा केली जाते. त्यामुळे या जिल्ह्याचे विभाजन करण्यासाठी आता सरकारी स्तरावरून हालचाली सुरू असल्याचं दिसतंय. बेळगाव जिल्ह्याचे तीन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यापूर्वी त्यावर लोकांचे आणि तज्ज्ञांचे मत घेतलं जाणार आहे. त्यानंतर विभाजनाचा हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सतीश जारकिहोळी यांनी दिली.
 
बेळगाव जिल्ह्यातून गोकाक आणि चिक्कोडी या दोन नव्या जिल्ह्यांची निर्मिती करावी अशी मागणी करत जिल्ह्यातील सर्व आमदारांनी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांची भेट घेतली असून मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती