गेले अडीच महिन्यांपासून कोल्हापूरचे आयुक्तपद रिक्त आहे.जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रभारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.कोल्हापूरला पूर्णवेळ आयुक्त मिळावा अशी मागणी आम आदमी पार्टीने लावून धरली आहे. मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोल्हापूरला एक चांगला आयुक्त देऊ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना दिले होते.या पार्श्वभूमीवर आप युवा आघाडीच्या वतीने पोस्टर कॅम्पेन राबवत “दादा, मुंबईला पोचलासा काय? पोचला असला तर कोल्हापूरला आयुक्त पाठवून द्या” अशा आशयचे पोस्टर धरून शहरातील छ.शिवाजी चौक, दसरा चौक यासारख्या विविध चौकात नागरिकांचे लक्ष वेधले. “शासन आपल्या दारी, पण आयुक्त नाही कोल्हापूर नगरी”, “सरकार एका रात्रीत बनतंय, मग आयुक्त द्यायला 3 महिने का” असे पोस्टर झळकवत महानगरपालिकेला आयुक्त मिळावा यासाठी आप युवा आघाडीने हे पोस्टर कॅम्पेन राबवले असल्याचे युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी सांगितले.