आमदारांना घरे देण्यापूर्वी शेतकऱ्यांना आणि एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्या भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील

शुक्रवार, 25 मार्च 2022 (21:22 IST)
माझे मुंबईत घर नाही तरीही आमदारांना मोफत घरे देणे मला मान्य नाही. सरकारने आमदारांना घरे देण्यापूर्वी शेतकऱ्यांना व एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्यावेत, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला बजावले.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबईत तीनशे घरे कायमस्वरुपी देण्याची घोषणा केली आहे. त्याबद्दल पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता शुक्रवारी विधानभवनाच्या प्रांगणात मा. चंद्रकांतदादा पाटील बोलत होते.
 
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “आमदार सोडून जातील आणि सरकार पडेल अशा भीतीने आमदारांवर वर्षाव करणे चालू आहे. मतदारसंघाचा विकासनिधी मुळात दरवर्षी दोन कोटी रुपये होता, तो कोरोनाच्या काळात चार कोटी केला व आता पाच कोटी रुपये केला. आमदारांच्या ड्रायव्हरचा पगार वाढविला, सहायकाचा पगार वाढविला. आमदारांना घरे देणार अशी घोषणा केली. कशासाठी घर पाहिजे ? माझे मुंबईत घर नाही. तरीही मी आग्रही असेन की तुम्ही मला जे घर देणार त्या पैशामध्ये शेतकऱ्यांना पैसे द्या, एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्या. माझ्यासारखे काहीजण सोडले तर अनेकांची घरे आहेत. घरे विकत घेण्याची त्यांची क्षमता आहे. मुळात कोणी कोणाला आमदार होण्यासाठी नारळ देऊन निमंत्रण दिले नव्हते. मला हे मान्य नाही. तुम्ही शेतकऱ्यांना पैसे द्या, एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्या, मग आमदारांना घरे द्या.”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती