बारामती लोकसभा : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत जवळपास पक्की; शरद पवार, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला

शनिवार, 2 मार्च 2024 (10:56 IST)
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामती मतदारसंघात केंद्रीत होणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. सुप्रिया सुळे यांनी याआधीत इथं विद्यमान खासदार म्हणून शड्डू ठोकला आहे. तर त्यांच्याविरोधात त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्याला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामतीच्या रस्त्यावर छोटे-मोठे टेम्पो फिरू लागलेत. या टेम्पोवर मतदारांना आवाहन करताना असं म्हटलंय की, 'एकजूट व्हा आणि विकासाला निवडा'. हे टम्पो आहेत अजित पवार गटाचे. इतकंच नाही तर अजित पवार यांनीही काही दिवसांपूर्वी म्हटलं की, "इतकी वर्ष वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका. शेवटची निवडणूक आहे, असं सांगून भावनिक केलं जाईल. पण विकासकामे करायची असतील, तर माझ्या विचाराच्या उमेदवाराला निवडून द्या." सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांना सत्ताधारी महायुतीच्या उमेदवार म्हणून उभं करण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. टीव्ही9 मराठीच्या कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील त्याला दुजोरा दिला आहे. अजित पवारांनी बारामतीमध्ये आपल्या खास शैलीत आवाहन केल्यामुळे बारामतीकर मतदार भावनेला साद देणार की, विकासाला यावर या मतदार संघाचा निकाल अवलंबून असणार. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या संभाव्य लढतीतल्या दोन्ही उमेदवारांच्या ताकदीबाबत आपण जाणून घेऊच. तत्पूर्वी, बारामती मतदारसंघाच्या इतिहासावर थोडक्यात नजर टाकूया.
 
पवारांचा बालेकिल्ला
बारामती मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. 'बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती' हे समीकरण राज्यातील जनतेच्या मनात आत्तापर्यंत पक्क झालं आहे. याला कारण म्हणजे शरद पवार यांनी 1967, 1972, 1978, 1980, 1985 आणि 1990 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका बारामतीमधून जिंकल्या होत्या. याच मतदारसंघातून त्यांनी 1984, 1996, 1998, 1999, 2004 मध्ये लोकसभेवर प्रतिनिधित्व केलं. अजित पवार यांनी 1991 मध्ये बारामती लोकसभा आणि नंतर 1991, 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 अशा सात वेळा विधानसभेची निवडणूक इथूनच जिंकली. तर मागच्या तीन टर्म पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे याच बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आता सुप्रिया सुळे या शरद पवार गटाकडून उमेदवार असतीलच, मात्र अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार उमेदवार असतील, अशी शक्यता आहे आणि या शक्यतेला बळ देणाऱ्या गोष्टी अजित पवार गटाकडूनही झाल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही संभाव्य उमेदवारांच्या जमेच्या नि आव्हानाच्या बाबी पाहूया.
 
सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार, बारामतीत कुणाची ताकद?
बारामतीतल्या सर्वसामान्य जनतेतही या लढतीची उत्सुकता दिसून येतेय. बऱ्याच वर्षांनी बारामतीत दोन तुल्यबळ लढतीची शक्यता वर्तवण्यात येतेय. जर खरंच ‘सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार’ यांच्यात लढत झाली, तर त्याचे राजकीय अर्थ काय असतील आणि आजच्या घडीला कुणाचं पारडं जड आहे, याबाबत बीबीसी मराठीनं बारामती लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास असणाऱ्या विश्लेषकांशी बातचित केली. बारामतीतून सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून पुढे आल्यास ही लढाई केवळ ‘सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे’ अशी राहणार नसून, ‘अजित पवार विरुद्ध शरद पवार’ असेल, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. शिवाय, यात या काका-पुतण्या जोडीच्या राजकीय वजनाची कसोटी लागणार आहे. सुप्रिया सुळेंच्या जय-पराजयाच्या निमित्तानं शरद पवारांची होमग्राऊंडवरील ताकद उरलीय की नाही, ते ठरेल आणि सुनेत्रा पवारांच्या जय-पराजयानं अजित पवारांची होमग्राऊंडवर पकड किती, हे ठरेल. अर्थात, सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारच उमेदवार असतील, हे आताच्या घडीपर्यंत ‘जर-तर’वर जरी अवलंबून असलं, तरी तीच शक्यता अधिक आणि सुनेत्रा पवारांचा बारामतीतली गेल्या काही दिवसांमधील उपस्थिती या संभाव्य लढतीला दुजोरा देणारीच आहे.
 
सध्याची आकडेवारी अजित पवारांच्या बाजूने
बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या विधानसभा मतदारसंघांमधील विद्यमान आमदारांचा कल पाहिल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पूरक वातावरण दिसून येतं. दौंडमध्ये भाजपचे राहुल कूल, इंदापुरात अजित पवार गटाचे दत्तात्रय भारणे, बारामतीत स्वत: अजित पवार, खडकवासल्यात भाजपचे भीमराव तपकीर आमदार आहेत. म्हणजेच, सहापैकी चार आमदार अजित पवार जो उमेदवार देतील, त्याच्या बाजूने असतील. पुरंदर आणि भोरमध्ये अनुक्रमे संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातली आमदारांची ताकद सुप्रिया सुळेंच्या विरोधात असल्याचं आकडेवारीवरून दिसतं. मात्र, या मतदारसंघातील भाजपचा मतदार ‘घड्याळा’वर मत देईल का, याबाबत अनेकांना शंका वाटते. तरीही भाजप या मतदारांना कशाप्रकारे सुप्रिया सुळेंविरोधात मत देण्यास तयार करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याचसोबत, सुनेत्रा पवारांचा जय किंवा पराजय हा अजित पवारांचा जय-पराजय असेल, त्यामुळे अजित पवार त्यांची राजकीय ताकद पणाला लावतील, यात शंका नाही आणि अजित पवारांच्या या ताकदीला सुप्रिया सुळे कशा पद्धतीने आव्हान देतील, हे पाहावं लागेल.
 
बारामतीत सुनेत्रा पवारांचं किती काम?
बारामतीमध्ये 'अजित पवारांची पत्नी' यापेक्षा 'सुनेत्रा वाहिनी' जास्त लोकप्रिय आहेत. सुप्रिया सुळेंसारख्या फायरब्रँड खासदारांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या तर त्यांनी केलेल्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार. धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) येथे जन्मलेल्या सुनेत्रा पवार या माजी कॅबिनेट मंत्री आणि खासदार पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत, त्या राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. 2000 साला पासून सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी असलेल्या, सुनेत्रा पवार यांनी 2010 मध्ये एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया नावाच्या एनजीओची स्थापना केली, जी पर्यावरण पूरक गावं विकसित करण्यासाठी काम करते. 2008 मध्ये, त्यांनी महाराष्ट्रातील 86 गावांमध्ये 'निर्मल ग्राम' मोहिमेचं नेतृत्व केलं होतं. यात कचरा व्यवस्थापन, शाश्वत विकास, सामुदायिक पशुधन व्यवस्थापन आणि ऊर्जा संवर्धनावर भर दिला गेला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रशंसा करण्यात आली. 2006 पासून, त्या बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा म्हणून काम करत आहेत ज्यात 15,000 हून अधिक महिलांना रोजगार मिळाला आहे. अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आणि त्यांच्या अनुपस्थितीत कार्यक्रम आणि सभांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती म्हणून बारामतीचे मतदार सुनेत्रा पवारांकडे पाहतात.
 
सुप्रिया सुळेंसाठी ही लढत किती आव्हानात्मक?
सुप्रिया सुळे 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीनवेळा बारामतीच्या खासदार आहेत. ‘दैनिक सकाळ’ वृत्तपत्राचे संपादक सम्राट फडणीस म्हणतात, “2009 आणि 2014 या दोन निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय हा स्वत:च्या ताकदीवर फारसा दिसला नसला, तरी 2019 साली त्यांनी विजय खेचून आणला आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी मतदारसंघात बरंच लक्ष दिलं आहे. त्यामुळे समोर आव्हान असताना 2019 साली मिळवलेल्या विजयाचा अनुभव त्यांना आता उपयोगात येऊ शकतो.” “शरद पवारांच्या हातून पक्ष काढून घेणं हे लोकांना फारसं आवडलंय, असं दिसत नाही. त्यात शरद पवार जर प्रचारासाठी मतदारसंघात फिरले, तर चित्र नक्कीच वेगळं दिसेल आणि ते अजित पवारांसाठी आव्हानाचं असेल,” असंही सम्राट फडणीस म्हणतात. सुप्रिया सुळे यांना संसदीय कामकाजाचा अनुभव आहे आणि खासदार म्हणून त्यांच्या कामाचं इतरत्र कौतुक होतं, हे त्यांच्या प्रतिमेस सकारात्मक बनवण्यास उपयोगी पडत आहेच, मात्र मतदारसंघात आपण जोडलेलो आहोत, हे त्यांना या निवडणुकीतून दाखवून द्यावं लागणार आहे. जर बारामतीत आगामी निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी झाली, तर इथली जनता बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर चुरशीच्या आणि रंगतदार निवडणुकीचा अनुभव घेईल, यात शंका नाही.
 
'बारामती'वर भाजपची नजर
2009 साली सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांता नलावडे यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट देशभरात होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासमोर रासपच्या महादेव जानकर यांचं आव्हान होतं. ही लढत अगदी अटीतटीची झाली होती. केवळ 69 हजार 719 मतांनी सुप्रिया सुळे जिंकल्या होत्या. तर 2019 मधील निवडणुकीत भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा 1 लाख 55 हजार मतांनी विजय झाला होता.पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात 2024 च्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग भाजपनं आधीपासूनच फुंकलं आहे.भाजपने देशभरातील काही लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. यात महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे मतदारसंघ असून बारमतीचाही यात समावेश आहे.2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले होते, "मुळावर घाव घाला."तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही बारामती दौऱ्यावर असताना '2024 मध्ये बारामतीमध्ये घड्याळ थांबेल' असं विधान करून राष्ट्रवादीला इशारा दिला होता.
 
अजित पवारांमुळे राजकीय समीकरणं बदलली
पाच दशकांहून अधिक काळ बारामतीवर पवार घराण्याचं नियंत्रण आहे. उमेदवारीबाबतही त्यांच्यात कायम एकमत होतं आलंय. मात्र, अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने बारामतीतील सर्वच राजकीय समीकरणं बदलली. 16 फेब्रुवारी रोजी बारामती येथील सभेत अजित पवार म्हणाले होते, "येत्या काही दिवसांत माझी पत्नी आणि दोन मुलं वगळता माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य माझ्या विरोधात प्रचार करताना दिसेल. माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य माझ्या विरोधात गेला तरी, जनता माझ्या सोबत आहे. प्रचार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण लोक मला एकटं पाडण्यासाठी हे किती मजल मारतात ते तुम्ही बघालच." आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवारांना मिळाल्याने 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाच्या खासदार सुळे यांच्यासमोर नवीन चिन्ह घेऊन लढण्याचं आव्हान असणार आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यासमोर उमेदवार कोण, यावर या मतदार संघाचा निकाल अवलंबून असणार आहे.
 
Published By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती