शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीविरोधात कोणाला मिळणार उमेदवारी?

शुक्रवार, 1 मार्च 2024 (12:08 IST)
शिरूरमधील महायुतीचा उमेदवार कोण असेल, याबाबत रोज नव्या चर्चा होत आहेत. दररोज नवीन नावे समोर येत आहेत. महायुतीतील प्रत्येक पक्ष या मतदारसंघावर आपला दावा सांगत आहे. विजयी कोण होणार या उत्सुकतेपूर्वी आता उमेदवारी कोणाला जाहीर होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 27 फेब्रुवारीला रात्री ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, शिवाजी आढळराव पाटील, प्रदीप कंद इत्यादींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळाल्याचा दावा केला जातोय.
 
यापूर्वीच अजित पवार गटाने शिरूरच्या जागेवर दावा केला होता. त्यामुळे आढळराव पाटील यांची शिरूरची जागा आता अजित पवार गटाला मिळाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जर त्यांना डावलण्यात आले, तर ते आता काय पावले उचलतील, त्यांची यापुढील रणनीती काय असेल, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र शिरूरची जागा शिवसेनेला मिळेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं आढळरावांनी नुकतंच माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. अजित पवार गटाने जरी शिरूरच्या जागेसाठी प्रबळ दावा केला असला, तरी त्यांचा उमेदवार कोण असेल, याबाबत जनतेत अद्यापही संभ्रम कायम आहे. विलास लांडे, प्रदीप कंद, की खुद्द शिवाजी आढळराव पाटील घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? याची उत्तरं काही दिवसांतच स्पष्ट होतील.
 
शिरूर मतदारसंघाची रचना
बारामती मतदारसंघानंतर पवार कुटुंबीयांसाठी दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. त्यामुळे इथल्या लढतीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ ‘शिवनेरी’, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ ‘वढू-तुळापूर’, ज्ञानेश्वर महाराजांनी जीवंत समाधी घेतलेले ‘आळंदी’, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर, हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थळ राजगुरुनगर (पूर्वीचे खेड) यांसारख्या स्थळांचा समावेश असलेला मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ.
 
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. या मतदारसंघाचा बराचसा भाग ग्रामीण असला; तरी खेड, चाकण, भोसरी, रांजणगाव यांसारख्या औद्योगिक क्षेत्रामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे कसा राहील, यासाठी सर्वांचाच प्रयत्न असणार आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे अतुल बेनके हे आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांशी ते जवळीक साधून आहेत. आंबेगावमध्ये सलग सात टर्म आमदार असलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत महायुतीत सामील झाले आहेत.
 
खेडमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येणारे दिलीप मोहिते पाटील यांना अजित पवार यांचे समर्थक मानले जाते. शिरूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांचे अमोल कोल्हे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. भोसरीमधून महेश लांडगे हे या मतदारसंघातील भाजपचे एकमेव आमदार आहेत. चेतन तुपे पाटील हे हडपसरमधून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. कोल्हेंशी त्यांचे चांगले सख्य आहे. हे सारे आमदार आता कोणाच्या मागे किती ताकद लावणार; शिरूर मतदारसंघात काही छुप्या आणि अंतर्गत खेळी खेळल्या जातील का, यावर विजयाची गणितं अवलंबून असतील.
 
2019 पूर्वीची परिस्थिती काय होती?
सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचेच वर्चस्व या मतदारसंघावर होते. मात्र शिवाजी आढळराव पाटील यांच्या रूपाने शिवसेनेने या मतदारसंघावर आपला भगवा फडकवला. इतकेच नव्हे, तर मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी एकदा आणि पुनर्रचनेनंतर दोनदा असे एकूण तीन वेळा निवडून येत शिवाजी आढळराव पाटील यांनी हा गड आपल्याकडे राखण्यात यश मिळवले होते. आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर शिवाजी आढळराव पाटील हे सलग तीन वेळा येथून निवडून आले होते.
 
असे म्हटले जाते, की शरद पवार जेव्हा बारामतीबाहेर लढण्यासाठी चाचपणी करत होते आणि शिरूरचा पर्याय जेव्हा समोर आला, त्यावेळी पवारांनी आढळरावांविरुद्ध लढण्यासाठी माघार घेतली होती आणि माढ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघातील 4-5 विधानसभा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या ताब्यात असतानादेखील आढळरावांना हरविणे कठीण जात होते. विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस, तर लोकसभेला आढळराव, असे समीकरण 2019 पर्यंत शिरूरमध्ये पाहायला मिळाले.
 
2019 च्या निवडणुकीत काय घडले?
‘राजा शिवछत्रपती’ या टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले अमोल कोल्हे यांनी राजकारणाची कास धरत 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. 2019 च्या लोकसभेपूर्वी तत्कालीन खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला तितका तुल्यबळ उमेदवार मिळत नव्हता. त्यावेळी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली होती. 2019 च्या निवडणुकीवेळी शिवाजी आढळराव पाटलांनी टीका करताना, कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख केला होता. त्यावर ‘मी छत्रपतींचा मावळा’ असे प्रत्युत्तर देत मराठा मतदार आपल्यापासून दूर जाणार नाही, याची काळजी कोल्हेंनी घेतली होती.
 
मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठा समाजानेदेखील कोल्हेंना मतदान केले होते, असं सांगितलं जातं याचाच फटका आढळरावांना बसला होता. त्यामुळे गेल्या निवडणुकीत जातीचा मुद्दा तितकासा चालला नसल्याचे दिसून आले होते. मात्र यावेळी मराठा आणि ओबीसींच्या मोर्च्यांमुळे जातीचा मुद्दा आता कितपत प्रभावी ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 
महाविकास आघाडीकडून कोल्हेंची उमेदवारी जवळपास निश्चित
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मोशी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या एका मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली. अलीकडेच मंचरमध्ये झालेल्या सभेत कोल्हेंनी प्रचाराचे रणशिंग फुंकले असे म्हणता येईल. कोल्हेंना टक्कर देण्यासाठी महायुतीकडून कोणती रणनीती आखली जाणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
 
कोण असेल महायुतीचा उमेदवार?
उमेदवारीसाठी महायुतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. शिरूर लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी माजी खासदार आणि सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील, भाजपकडून महेश लांडगे आणि अजित पवार गट हे सारेच इच्छुक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत. त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू. खासदार नसतानाही मागील वर्षभरात कोट्यवधी रुपयांची कामे केली असल्याचा त्यांनी दावा केलाय. मागील काही दिवसांपासून मतदारसंघात ते जोरदार ॲक्टिव्ह झाल्याचे चित्र आहे. मात्र, नुकतीच पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळेल, अशी चर्चा सुरू होती. यावर उत्तर देताना, “मी निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार”, असं आढळरावांनी स्पष्ट केलंय.
 
भोसरीचे आमदार महेश लांडगे हेदेखील भाजपकडून इच्छुक असल्याचे बोललं जातंय. आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि देवेंद्र फडणवीस यांचे खास समजले जाणाऱ्या महेश लांडगे यांचा आढळरावांऐवजी महायुतीकडून विचार होऊ शकतो. गेल्या वर्षभरापासून भाजप ज्या पद्धतीने महेश लांडगे यांना 'प्रोजेक्ट' करत आहे, त्यावरून लांडगेंना उमेदवारी देऊन शिरूरची जागा आपल्याला मिळावी, यासाठी भाजप नक्कीच प्रयत्नशील असेल. अजित पवार यांनी कोल्हेंना पाडणार असल्याचे आव्हान दिल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार गटाने शिरूरच्या जागेसाठी दावा केलाय. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून रोज नवीन नावे समोर येत आहेत. विलास लांडे, प्रदीप कंद यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
 
कोण असेल लोकांची पसंती, ‘संसदरत्न खासदार’ की ‘दांडगा जनसंपर्क असलेला खासदार’ ?
महायुतीकडून जर आढळरावांना तिकीट मिळाले, तर ‘कोल्हे विरुद्ध आढळराव’ असा सामना रंगू शकतो. “तीन वेळा संसदरत्न पुरस्कारप्राप्त खासदार अमोल कोल्हे मतदारसंघात दिसले नाहीत; केवळ संसदेमध्ये भाषणं करुन निवडून येता येत नाही”, असा आरोप विरोधक करत आहेत.
 
तर “खासदारांचे मुख्य काम हे दिल्लीत असते, त्यांना संसदेत जबाबदारी पार पाडावी लागते; शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत सातत्याने मांडण्याचे काम कोल्हेंनी केलं आहे”, असं कोल्हेसमर्थकांचे म्हणणे आहे. महायुतीकडून जर आढळरावांना तिकीट मिळाले तर मतदार कोणाला पसंती देतील… ‘संसदरत्न खासदार’ की ‘दांडगा जनसंपर्क असलेला खासदार’, हे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालावरुनच स्पष्ट होईल.
 
‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत?
काही दिवसांपूर्वी मंचरमध्ये झालेल्या सभेत शरद पवारांनी वळसे पाटलांवर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवारांनी 4 मार्चला मंचरमध्ये सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मंचरमध्ये ‘पवार विरुद्ध पवार’ असा कलगीतुरा रंगण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी कोल्हेंविरोधात उमेदवार उभा करुन तो निवडून आणण्याचे सुतोवाच केले होते. “शिरूर मतदारसंघात आम्ही उमेदवार देऊन तो निवडून आणणारच”, असं आव्हान अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिलंय. त्यानंतर मागील काही दिवसांपासून सुनेत्रा पवार या शिरूर मतदारसंघात ॲक्टिव्ह झाल्या असल्याचे चित्र आहे.
 
“आम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा करणार आहोत”, असे दिलीप वळसे पाटलांनीदेखील नुकतंच स्पष्ट केलंय. मागच्या वेळी कोल्हेंच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी आता कोल्हेंविरोधात शड्डू ठोकल्याने कोल्हेंना ही निवडणुक सोपी जाणार नाही, हे मात्र नक्की. महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात अजित पवार गट काय हालचाली करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कोल्हेंना पाडण्याचा चंग बांधलेले अजित पवार आता काय हालचाली करतील हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. त्यामुळे ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत शिरूरमध्ये रंगू शकते.
 
कोल्हे विरुद्ध लांडगे?
शिरूर लोकसभेतील भाजपचे एकमेव आमदार असलेल्या महेश लांडगे यांना महायुतीकडून जर उमेदवारी मिळाली, तर ‘कोल्हे विरुद्ध लांडगे’ असा सामना पाहायला मिळू शकतो. लांडगे यांचे फडणवीसांसोबत चांगले सख्य आहे. भोसरीमध्ये त्यांचे निश्चितच वजन आहे. आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश लांडगे यांचा येथे मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. ते निश्चितच कोल्हेंपुढे एक मोठं आव्हान निर्माण करू शकतील, असे बोलले जात आहे. त्यामुळेच भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यास ‘कोल्हे विरुद्ध लांडगे’ असा सामना शिरूरमध्ये रंगू शकतो. मात्र अजित पवारांची भूमिका यावेळी निर्णायक ठरू शकते.
 
कोणते मुद्दे निर्णायक ठरतील?
यंदाच्या निवडणुकीत जातीचा मुद्दा कितपत चालू शकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न, आंदोलने; ओबीसी मोर्चा यांसारखे घटक या निवडणुकीवर परिणाम करू शकतात. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याने दलितांची मते कोणाला मिळतील, हे पाहणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंदेखील प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केल्याने मनसे कितपत आव्हान निर्माण करू शकतो, याचा निश्चितच निवडणुकीवर परिणाम होईल. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण आणि औद्योगिकीकरण होत आहे. परिणामी येथील शेतीचे क्षेत्र कमी होत चालले आहे.
 
वाढते विकासविषयक प्रकल्प, रस्त्यांचे रुंदीकरण यांमुळे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या शेतजमिनींच्या भूसंपादनामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी येथील शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. या क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हे एक मोठे संकट बनले आहे. बैलगाडा शर्यत हा येथील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सरकारने नुकतीच या बैलगाडा शर्यतींवर असलेली बंदी उठवल्यामुळे याचा राजकीय फायदा कोणाला कितपत होणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
 
वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याचीच झाल्याने येथील जनतेसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. पुणे-नाशिक सेमीहायस्पीड रेल्वेचा कागदोपत्री मंजूर झालेला प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी अद्यापही प्रतिक्षाच करावी लागत आहे. यासोबतच वाढती महागाई, वाढती बेरोजगारी यांकडे मतदार कसे पाहतात, याचाही निवडणुकीवर निश्चितच परिणाम होईल. अमोल कोल्हेंविरोधात लढण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील, महेश लांडगे, अजित पवार गट या सर्वांनीच दंड थोपटले आहेत.
 
शिरूरमधील हालचालींना वेग येऊन रोज नव्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघातील लढत मात्र अटीतटीची होणार, हे नक्की. एकंदरीतच शिरूर मतदार संघामध्ये महायुतीसाठी जागा वाटपाचा तिढा सोडवणे, हे नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. परिणामी, शिरूरमध्ये तिरंगी लढत झाल्यास नवल वाटायला नको. कोल्हेंना पाडण्यासाठी महायुतीतील गट एकमेकांना कितपत सहकार्य करणार, यावरच विजयाची सारी समीकरणं अवलंबून आहेत. शिरूरमधील मतदार आपल्या समस्या सोडवण्यासाठी कोणाला कौल देतील, हे येणारा निकालंच स्पष्ट करेल.
 
Published By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती