शवविच्छेदनातून खून केल्याचे उघड; तक्रारीनंतर रस्त्यातच थांबविली होती अंत्ययात्रा

शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 (09:29 IST)
गुरुवारी एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दुपारी तिची अंत्ययात्रा पांढरकवडा रस्त्याने निघाली. मात्र डायल ११२ वरून महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार आल्यानंतर ही अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला होता. अखेर किरकोळ भांडणातून पतीनेच दीपालीचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी या प्रकरणात महेश मिश्रा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत त्यास बेड्या ठोकल्या आहे.
 
दीपाली ऊर्फ नंदिनी महेश मिश्रा (२८, रा. जामनकरनगर यवतमाळ) असे या महिलेचे नाव असून गुरुवारी दीपालीचा झोपेतच मृत्यू झाला, अशी माहिती तिचा पती महेश जनार्दन मिश्रा याने शेजारी तसेच नातेवाईकांना दिली. त्यानंतर दीपालीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली.
 
दरम्यान हा प्रकार संशयास्पद असल्याने एका नागरिकाने डायल ११२ या क्रमांकावरून संपर्क करीत पोलिसांकडे शंका व्यक्त केली. यानंतर पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी पथकासह महेश मिश्रा याच्या घराकडे धाव घेतली. मात्र तेथे कोणीही आढळले नाही. अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे गेल्याचे समजल्यानंतर  पोलिसांनी ही अंत्ययात्रा रस्त्यात थांबवून दीपालीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. दीपालीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, 

हे तपासण्यासाठी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात दीपालीचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे तसेच गळा आवल्यानंतर श्वसननलिका डॅमेज झाली होती, असा अहवाल आला. पोलिसांनी लगेच महेशला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर किरकोळ भांडणातून पती महेशने दीपालीचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणी आजी रत्नकला शंकर तिवारी रा. वारज पो. तिवसा ता. दारव्हा यांच्या फिर्यादीवरून  महेश जनार्दन मिश्रा (२८) याच्याविरुद्ध कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती