कोल्हापूर :शस्त्र परवाना नुतनीकरणाची मुदत आता 3 वर्षाऐवजी 5 वर्षे करण्यात आली आहे. याबाबतचे राजपत्र नुकतेच केंद्रीय विधी व न्याय विभागाकडून प्रसिध्द करण्यात आले आहे. जिह्यात सुमारे साडेसात हजार शस्त्र परवानाधारक आहेत. नुतनीकरणाच्या मुदतवाढीची अंमलबजावणी या महिन्यापासून होणार आहे. यामुळे परवानाधारकांना दिलासा मिळाला आहे.
स्वसंरक्षण, शेतीमध्ये येणार्या जनावरांपासून संरक्षणासाठी, सैन्य दलातून निवृत्त झालेल्या अधिकारी व सैनिकांसाठी शस्त्र परवाना दिला जातो. या परवान्यावर बंदूक, रिव्हॉलवर, पिस्टल अशी शस्त्रे वर्गवारीनिहाय घेता येतात. त्यासाठी जिल्हा दंडाधिकार्यांकडून हा शस्त्र परवाना दिला जातो. त्यानंतर दर तीन वर्षांनी या परवान्याचे नुतनीकरण संबंधित भागातील प्रांताधिकार्यांकडून केले जाते. नुतनीकरण करताना संबंधित शस्त्र परवानाधारकाने नुतनीकरणाचा अर्ज, पोलीसांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, जिल्हा शल्य चिकित्सकांकडील आरोग्य प्रमाणपत्र आदी कागदपत्रे द्यावी लागतात. त्यासोबतच आपल्याकडील शस्त्रही सादर करावे लागते. अशा प्रक्रियेतून शस्त्र परवानाधारकांना जावे लागते. परंतु आता त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. 3 वर्षांनी नुतनीकरण करण्याच्या शस्त्र परवान्याला आता 5 वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. याबाबतची धोरणात्मक दुरुस्ती केंद्रीय विधी व न्याय विभागाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार नुकतेच राजपत्रही प्रसिध्द करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार या महिन्यापासून कार्यवाही सुरु होणार आहे.