‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला’या वक्तव्यानंतर अखेर भाजप आमदार प्रसाद लाड यांचा माफीनामा

सोमवार, 5 डिसेंबर 2022 (08:07 IST)
मुंबई  – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात येत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं असताना, आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचेही शिवाजी महाराजांबाबतचे असे एक वेळेच आश्चर्यकारक आणि अज्ञानी विधान समोर आल्याने, नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
इतकेच नव्हे तर तसा वाद देखील सुरू झाला आहे, दि. ३ नोव्हेंबर रोजी मुंबईत कोकण महोत्सव पार पडला. या महोत्सवात बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. त्यानंतर या आमदार प्रसाद लाड यांच्या चुकीच्या व वक्तव्याचा म्हटल्याचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. यावरून आता भाजपावर जोरदार टीका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पत्रकारांना प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
 
खासदार राऊत म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद आज भाजपा उपटसुंभानी उकरून काढला. हे सर्व ठरवून चाललेय का? औरंगजेब किंवा अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे सत्ताधारी शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत. शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभाना मान्य आहे काय? असा सवालही संजय राऊतांनी भाजपाला केला आहे. तसेच इतका करारा जबाब मिलेगा! असे म्हणत इशाराही त्यांनी दिलाही आहे. त्यानंतर यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसाद लाड यांना लक्ष्य करत भाजपावर टीका केली. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असा सल्ला राष्ट्रवादीने दिला. तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आता माफी मागून चालणार नाही. तर भाजपाने आता रगडून प्रायश्चित्त केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती