अण्णा हजारांचे माजी स्विय सहाय्यक अडकले घोटाळ्यात ! खाजगी कंपनी विरोधात गुन्हा दाखल
शुक्रवार, 4 मार्च 2022 (21:11 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला पिण्याचे पाणीपुरवठा केल्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी साई सहारा अॅण्ड इन्फ्रा फॅसिलीटी या खाजगी कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यातील धक्कादायक गोष्ट अशी कि साई सहारा ही कंपनी राळेगण सिद्धी येथील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा माजी सचिव सुरेश पठारे , निघोज येथील मळगंगा डेअरी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मच्छिंद्र लंके , अभय औटी , दादाभाऊ पठारे , नितीन अडसुळ , विठ्ठल गाजरे, विठ्ठल पवार यांच्या मालकीची आहे
याप्रकरणी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आनंद बबनराव रुपनर यांनी पारनेर पोलिसांना फिर्याद दिली आहे. पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई विभाग यांनी पारनेर येथील साई सहारा या कंपनीला टँकरने पाणी पुरवठा करण्याचे गेली पाच वर्षे कंत्राट दिले होते.
या कंपनीने पाणी पुरवठा करताना अनेक शासन नियमांचा भंग करून कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करून शासनाची फसवणूक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि जिल्ह्यात 2019 मध्ये दुष्काळी परिस्थिती होती. याच कालावधीत पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या खेपा बोगस दाखवून मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते.
या आरोपांवरून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद रुपनर यांच्या फिर्यादीवरुन बुधवारी (ता. 2) पारनेर पोलिस ठाण्यात पुरवठा करणाऱ्या साई सहारा इन्फ्राण्ड फसिलिटी प्रा. लि. यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तब्बल 102 कोटी रुपयांचा खर्च !
अहमदनगर जिल्ह्यात 2019 साली निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठ्यावर तब्बल 102 कोटी रुपयांचा खर्च झाला होते.
जिल्ह्यात 2019 मध्ये जिल्ह्यातील बहूतांश तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा टॅंकरने पाणी पुरवठा केला जात होता. जिल्ह्यातील विक्रमी टँकर त्या कालावधीत धावले. त्यावेळी 800 पेक्षा अधिक टॅंकरने जिल्ह्यात पाणी पुरवठा झाल्याची कागदोपत्री नोंद आहे.
टॅंकरने खेपा कमी करुन जास्त दाखवल्या…
त्यावर्षी पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरने खेपा कमी करुन जास्त दाखवल्या, आंतरातही घोळ केला, तसेच अन्य त्रुटीतून टॅंकर घोटाळा केल्याचा आरोप करत निघोज (ता. पारनेर) येथील लोकजागृती शोध प्रतिष्ठानने तक्रार करुन चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी हे प्रकरण बरेच गाजले होते.
शासनाने या प्रकाराच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त करुन चौकशी केली. समितीने विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना हा अहवाल अवलोकनासाठी पाठवला.
गैरव्यवहार झाल्याचा ठपका !
त्या शासनाच्या करारनाम्याचा भंग केला. खेपा न भरता त्या भरल्याचे दाखवत अतिरिक्त रक्कम घेऊन शासनाची फसवणूक केल्याचे व गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद रुपनर यांच्या फिर्यादीवरुन बुधवारी (ता. 2) पारनेर पोलिस ठाण्यात पुरवठा करणाऱ्या साई सहारा इन्फ्राण्ड फसिलिटी प्रा. लि. यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी पुरावे नष्ट करण्याची शक्यता !
दरम्यान आर्थिक गैरव्यवहार व शासनाची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आम्हाला पोलिसांकडून कळवण्यात आले आहे.
पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करावी. आरोपी पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया रामदास घावटे, (तक्रारदार) अध्यक्ष, लोकजागृती सामाजिक संस्था निघोज यांनी याबाबत बोलताना दिली आहे.