नापिकीने तरुण शेतकरी झाला कर्जबाजारी, युट्युबवर पाहून केली अफूची शेती

शुक्रवार, 4 मार्च 2022 (21:03 IST)
वारंवार हुलकावणी देणारा निसर्ग आणि अवकाळी पाऊस यामुळे बऱ्याचवेळा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणारा तरुण शेतकरी असाच नापिकीमुळे कर्जबाजारी झाला. तरूणाने युट्यूबवर व्हिडीओ पाहून चार बिघे शेतात अफूची लागवड केली. पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी धडक कारवाई करीत त्याला ताब्यात घेतले.
 
निसर्गाचे रूप दिवसेंदिवस बदलत असून कधी पाऊस तर कधी ऊन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होऊन आत्महत्येची वेळ येऊन ठेपते. चोपडा तालुक्यातील वाकळी येथील प्रकाश सुदाम पाटील हा तरुण शेतकरी देखील शेतातील सततची नापीकीमुळे कर्जबाजारी झाला होता. कमी वेळी जास्त पैसे कमविण्याचे स्वप्न दिसू लागल्याने तो वेगवेगळे अकलेचे तारे तोडू लागला. झटपट पैशाच्या प्रयत्नात त्याने युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून अफूची लागवड कशी करावी याची माहिती जाणून घेतली.
 
स्वतःच्या पाच बिघे शेतापैकी चार बिघे शेतात अफूची लागवड केली. विशेष म्हणजे कुणालाही समजू नये म्हणून शेतीच्या आजूबाजूला मक्याची देखील लागवड केली. दरम्यान अफूची लागवड केल्याची गोपनिय माहिती पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांना मिळाली.  डॉ.प्रविण मुंढे, चोपडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांच्या पोलीस पथकाने शेतात जावून धडक कारवाई केली. तरूणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली असता आपण कर्जबाजारी झाल्यामुळे ही अफूची लागवड केल्याची माहिती दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती