EDची चौकशी टाळणण्यासाठी अनिल देशमुखांची सुप्रीम कोर्टात धाव, आज सुनावणीची शक्यता

सोमवार, 5 जुलै 2021 (09:48 IST)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात त्यांच्याविरोधात कोणतीही सक्तीची कारवाई करण्यात येऊ नये, अशी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज (5 जुलै) सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांना EDने (अंमलबजावणी संचलनालय) समन्स बजावलं आहे.
 
वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना आज (5 जुलै), तर ऋषीकेश देशमुख यांना उद्या (6 जुलै) रोजी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. अनिल देशमुख हे मनी लाँडरिंगमध्ये सहभागी आहेत. देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांनी अनिल देशमुख यांच्यासाठी पैसे घेतले, असा आरोप ईडीनं केला आहे.
 
याप्रकरणी अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहायक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना 6 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आता चौकशी करण्यासाठी ईडीनं अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला समन्स बजावलं आहे.
 
याआधीनं ईडीनं अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतल्या घरांवर छापेमारी केली होती. त्यावर बोलताना देशमुख यांनी म्हटलं होतं, "परमबीर सिंह यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ईडी, सीबीआय यांना तपासात संपूर्ण सहकार्य करणार आहे. "
 
प्रकरण काय?
मनी लाँडरींग प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आल आहेत. तसंच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांचे कुटुंबीयदेखील चौकशीच्या फेऱ्यात आहेत.
 
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात EDने दाखल केलेल्या गुन्ह्याची सुनावणी सध्या मुंबईच्या सत्र न्यायालयात सुरू आहे. प्रिव्हेनशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टअंतर्गत (PMLA) या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.
 
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केले होते. 100 कोटींच्या वसुलीच्या या आरोपांनंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्याला लागला आणि त्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे.
 
याच संपूर्ण प्रकरणात ED ने मुंबईतील अंधेरी परिसरात हॉटेल आणि बार चालकाचे जबाब नोंदवले आहेत. या बारमालकाने महिन्याला अडीच लाख रुपये सचिन वाझे यांना दिल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या नियंत्रणानंतर बार सुरू झाल्यावर कुठलाही त्रास न देण्यासाठी हे पैसे दिल्याच सांगण्यात आलं.
 
कुटुंबीयांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा
गेल्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये ईडीनं तिसऱ्यांदा अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. मात्र त्यांच्याबरोबर मुलालाही समन्स बजावण्यात आल्यानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांविरोधातही आता चौकशीचा फेरा लागल्याचं दिसत आहे.
 
अनिल देशमुख आणि कुटुंबियांच्या थेट मालकीच्या 11 कंपन्या असून अनिल देशमुख यांच्या जवळच्यांच्या मालकीच्या 13 कंपन्या आहेत, या कंपन्यांची आपसात पैशांची देवाणघेवाण होते आणि पैशाच्या व्यवहारासाठी ठोस कारण आढळून आलं नाही, याचाच अर्थ पैशांची हेराफेरी केली जात होती, असं ईडीने म्हटलंय.
 
25 मे रोजी ईडीच्या तीन पथकांनी नागपूरात छापेमारी केली होती. यात अंबाझरी परिसरातील शिवाजीनगरमधील हरे कृष्ण अपार्टमेंट मध्ये राहणारे सागर भटेवरा यांच्या घरी कारवाई केली. भटेवरा हे रबिया प्रॉपर्टीजचे संचालक असल्याचं आणि याच कंपनीत अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश हा देखील संचालक असल्याच ED च्या तपासात उघड झाल होतं.
 
याच वेळी सदर भागातील न्यू कॉलनीतील समीत आयझॅक आणि गिट्टीखदानच्या जाफरनगरमधील कादरी बंधूंकडे ED ने छापे टाकले. हे तिघेही देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांचे मित्र आहेत, असा संशय ED ला आहे.
 
त्यामुळे ऋषिकेश देशमुख यांचीही चौकशी करून या प्रकरणाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न ईडी करणार आहे.
 
ईडीनं यापूर्वीच अनिल देशमुख यांच्या मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी आणि नागपुरातील सिव्हिल लाईन्स येथील जीपीओ चौकातील 'श्रद्धा' या निवासस्थानी तसंच देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या घरीही छापा टाकत कारवाई केली आहे.
 
CBI चा तपास कुठपर्यंत आलाय ?
21 एप्रिल रोजी CBI ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या कलम 7 आणि भारतीय दंड संहिता IPC च्या कलम 120 B नुसार गुन्हा दाखल केला.
 
CBI ने या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या संबधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. अनिल देशमुख यांच्या दोन पीएचीही चौकशी CBI ने केली. या प्रकरणात दाखल असलेल्या FIR वर नियमित तपास सुरु असल्याच CBI ने कोर्टाला सांगितल आहे.
 
30 एप्रिल रोजी CBI ने विशेष CBI न्यायालयात तपासाचा प्राथमिक अहवाल सादर केला.
 
या अहवालात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले, "या प्रकरणात आम्ही काही ठिकाणी छापेमारी केली आणि पुरावे जमा केले. काही साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले. आतापर्यंतच्या तपासाची माहिती आणि पुरावे बंद लिफाफ्यात कोर्टाला आम्ही सादर करित आहोत."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती