संभाजी भिडे यांनी मंत्रालयाबाहेर प्रश्न विचारण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराला आधी टिकली लावून ये मग मी बोलेन, असा सल्ला दिल्याने वादाला तोंड फुटले आहे. विविध क्षेत्रातून संभाजी भिडे यांच्या या विधानाचा निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांनी कसं जगावं, हे कुणी सांगू नये, असं विधान अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
पंढरपूरमध्ये अमृता फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांना संभाजी भिडेंनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अमृता फडणवीस म्हणाल्या की, संभाजी भिडे गुरुजींचा मी खूप आदर करते. ते एक हिंदुत्वाचे स्तंभ आहेत. पण मला वैयक्तिकरीत्या असं वाटतं की, कुठल्याही महिलेने कसं जगावं, याबाबत कुणी सल्ला देऊ शकत नाही. तिची एक जीवनशैली असते. त्याप्रकारे ती जगते. त्याचा आदर करावा, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.