संभाजी भिडे कोण आहेत? त्यांच्याबद्दल या 10 गोष्टी माहिती आहेत का?
गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (09:13 IST)
शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला म्हटले की, 'आधी टिकली लाव मगच मी तुझ्याशी बोलतो.'
त्यामुळे पुन्हा एकदा कुंकू टिकली वादाला तोंड फुटलं आहे. सर्व स्तरांतून भिडे यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. संभाजी भिडे यांनी वक्तव्य करण्याचं आणि त्यावरून वाद होण्याची ही पहिली वेळ नाही.
त्यांनी याआधीही अशी काही वक्तव्यं केली आहेत.
देश उभारण्याची ताकत मिळायची असेल,तर हिंदुस्थानाच्या 123 कोटी लोकांचे रक्त गट बदलला पाहिजे आणि तो छत्रपती शिवाजी - संभाजीचं केला पाहिजे, असं विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले होतं.
तसेच देशाला म्लेंच्छ, अँग्लो आणि गांधी बाधा झाली आहे,असं विधानही भिडे गुरुजी यांनी केलं होतं. मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
काही काळापूर्वी सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'अमेरिकेने भारतीय कालगणनेनुसार एकादशीला यान सोडल्याने ते यशस्वी झाले,' असं वक्तव्य केलं होतं.
संभाजी भिडे यांच्याबाबत वेगवेगळे दावे सोशल मीडियावर केले जातात. वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप पोस्टमधून त्यांची वेगवेगळी माहिती व्हायरल होत असते.
संभाजी भिडे कोण आहेत? त्यांच्याबद्दलच्या या 10 गोष्टी माहीत आहेत?
1. संभाजी भिडे सांगलीत राहतात. त्यांचं वय 80 आहे. त्यांचे मूळ नाव मनोहर असं आहे. भिडे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी आहे.
2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे. संभाजी भिडे 1980च्या दशकात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त कार्यरत होते. तसंच त्यांचं शिक्षण एमएस्सीपर्यंत झालं आहे, असं सांगलीतले ज्येष्ठ पत्रकार गणेश जोशी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
जोशी म्हणाले, "संभाजी भिडे यांनी सांगलीत 'संघा'च्या बांधणीचं काम सुरू केलं होतं. पण काही वाद झाल्यानंतर त्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्यात आली. पण ते बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. त्यांनी सांगलीमध्ये प्रतिसंघ स्थापला होता. तसंच संघाच्या दसरा संचलनाला पर्याय म्हणून दुर्गामाता दौड सुरू केली."
3. जोशी म्हणाले, "बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी वाद उफाळला होता तेव्हा भिडे यांच्या 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदुत्ववादी संघटनांना अभिप्रेत असलेला इतिहास ते सांगतात."
राजकीय प्रतिष्ठा हवी असलेले समाजातील विविध स्तरांतील लोक त्यांच्या संघटनेत सहभागी झाल्याचं जोशी यांचं निरीक्षण आहे.
4. जून 2017 मध्ये पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात अडथळा आणल्याचा आरोप भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर आहे.
5. 2009 मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि इतर काही संघटनांनी 'जोधा अकबर' या सिनेमाला विरोध केला होता. त्यातून सांगली, कोल्हापूर, सातारा या भागांत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता.
6. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची स्थापना 1984 ला झाल्याची नोंद या संघटनेच्या वेबसाईटवर आहे.
7. 'हिंदू समाजाची उगवती तरुण पिढी शिवाजी, संभाजी रक्तगटाची बनवणे हेच श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ध्येय आहे,' असं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
8. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं रायगडावर 32 मण इतक्या वजनाच्या सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे. धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास, दुर्गामाता दौड, धारातीर्थ यात्रा, शिवराज्यभिषेक दिन असे विविध उपक्रम राबवले जात असल्याचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
9. सांगलीतल्या गावभाग परिसरात भिडे राहतात. सांगली येथील नागरिक मोहन नवले त्यांच्या शेजारीच राहतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की भिडे गुरूजी यांची राहणी साधी आहे.
10. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भिडे यांची भेट 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान रायगड इथं झाली होती.