अक्षय कुमार 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटात साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (22:34 IST)
नुकताच चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात छ. शिवाजी महाराजांची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहे.
 
मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु या चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 2023 च्या दिवाळीला हा चित्रपट येईल असे निर्मात्यांनी सांगितले आहे.
 
वसीम कुरेशी यांच्या कुरेशी प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत.
 
राज ठाकरेंमुळे स्वीकारला हा चित्रपट
या चित्रपटाचा फर्स्ट लूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. यावेळी अक्षय कुमारने मराठीत एक छोटेखानी भाषण केले.
 
अक्षय कुमार म्हणाला की हा चित्रपट मला कसा मिळाला याची गोष्ट सांगणे आवश्यक आहे. राज ठाकरेंनी मला म्हटले की मी शिवाजी महाराजांची भूमिका साकारावी याबद्दल विचार करावा.
या चित्रपटासाठी आणि भूमिकेसाठी मी योग्य वाटलो यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. मी माझी सर्व शक्ती पणाला लावून ही भूमिका साकारणार आहे असे अक्षय कुमारने म्हटले.
 
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी ज्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व एका अभिनेत्यामध्ये हवे होते त्या सर्व गोष्टी अक्षय कुमारमध्ये मला आढळल्या म्हणून मी अक्षय कुमारची निवड केली असे महेश मांजरेकर यांनी म्हटले.
 
Published by- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती