छत्रपती शिवाजी महाराजांवर दोन ते तीन भागांत भव्य दिव्य सिनेमा घेऊन येतोय--राज ठाकरे

सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (08:53 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांवर दोन ते तीन भागांत भव्य दिव्य सिनेमा घेऊन येतोय, त्यावर सध्या काम सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. ते मुंबईत 'हर हर महादेव' सिनेमाच्या निमित्तानं आयोजित प्रमोशनल कार्यक्रमात अभिनेता सुबोध भावेनं घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.'चित्रपटाला आवाज देणं सोपं नव्हतं, पण शिवरायांचा चित्रपट म्हणून आवाज दिला'- राज ठाकरे
 
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग घेऊन त्यावरच सिनेमा करणं म्हणजे त्या माणसावर अन्याय करण्यासारखं आहे असं मला वाटतं. मग माझ्या मनात आलं की टेलिव्हिजन सीरिअल करू, त्यासंदर्भात माझं आशुतोष गोवारीकर यांच्याशी बोलणं झालं. त्यावेळी तिथं नितीन चंद्रकांत देसाई तिथं होते. त्यांनी त्यात रस दाखवला आणि त्यांनी त्यावर काम सुरू केलं. ती सीरिअल येऊनही खूप वर्ष झाली. आता सर्व प्लॅटफॉर्म बदलले आहे. सध्या माझं त्यावर काम सुरू आहे. आताच मी तुम्हाला कुणाकडे काम दिलंय वगैरे या सगळ्या गोष्टी सांगत नाही. पण दोन ते तीन भागांत छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आणायचा माझा विचार सुरू आहे. आता त्याबद्दल सांगण्यासारखं काहीच नाही. ते झालं की सविस्तर बोलूच", असं राज ठाकरे म्हणाले.
 
अभिनेता सुबोध भावे लवकरच शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित 'हर हर महादेव' चित्रपटात दिसणार आहे. सुबोध शिवरायांच्या भूमिकेत आहे, तर अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती