पंकजा मुंडे म्हणाल्या अमित शहांनी दुसऱ्या राज्यात लक्ष द्यावं

गुरूवार, 7 मार्च 2024 (09:01 IST)
अमित शहा हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजपाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंचावर भाजपात नाराज असलेल्या पंकजा मुंडे भाषणासाठी उभ्या राहिल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, महाराष्ट्रापेक्षा त्यांनी दुसऱ्या राज्यात लक्ष द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही जास्तीत जास्त खासदार निवडून आणून देऊ, असा विश्वास मंचावरील सर्वांनी त्यांना देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
 
पंकजा मुंडे म्हणाल्या की, अमित शाह यांचं आज इथे येणं हे भविष्यामध्ये अजून ताकदीने या मैदानात उतरण्याचं द्योतक आहे, असं म्हणायला हरकत नाही. जिंदगी के रंगमच पर कुछ इस तर निभाया अपना किरदार, पडदा गिर चुका है, तालिया फिर भी गुंज रहीं हैं, असं ज्यांनी काम केलं त्या माझ्या पित्याच्या चरणी नतमस्तक होऊन एवढंच सांगते की, या देशाला जेव्हा सर्वात जास्त गरज होती की, गरिबांच्या स्वप्नांना ठिगळ लावण्याची, एका गरिबाला खुल्या आसमानातून स्वत:च्या पक्क्या घरामध्ये पोहोचवण्याची आणि माता-बहिणीच्या डोळ्यातलं पाणी नळामध्ये आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
 
अनेक वर्ष ज्या फाटक्या टेंटमध्ये प्रभू श्रीरामांचं वास्तव्य होतं त्यांना मंदिरात नेण्यामध्ये यश आलं आहे. त्यामुळे श्रीरामांवर प्रेम करणाऱ्या, विश्वास ठेवून रामराज्याकडे डोळ्यामध्ये आशा लावून प्रतिक्षा पाहणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक माणसाला रामराज्य आलं पाहिजे, हे वाटण्याचं दायित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण कामाला लागले आहेत. एक मोठा यज्ञ सुरू झाला आहे. या यज्ञामध्ये सर्वांनी आपल्या प्रयत्नांची आहुती द्यायची आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती