महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीसंबंधी याचिकांवील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी आता 13 जानेवारीला घेण्यात येईल, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. मंगळवारी त्यांनी सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घोषित केला. या याचिकांची सुनावणी पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर होत आहे. या याचिका शिवनसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून सादर करण्यात आल्याअसून त्यांची संख्या सात आहे.
ठाकरे गटाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत फेटाळली होती. शिवसेनेचे नाव, चिन्ह आणि मान्यता यांच्यासंबंधी निर्णय घेण्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगाला रोखावे, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. तथापि, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देताना ही याचिका फेटाळली होती. तो ठाकरे गटाला धक्का होता.
त्वरित घेण्याची मागणी
या याचिकांवर त्वरित सुनावणी करावी, अशी मागणी मंगळवारच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली. तथापि, घटनापीठासाठी 5 न्यायाधीशांची उपलब्धता एकाच वेळी होणे अशक्य असल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. आगामी काळात अनेक महत्वाच्या याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या संबंधात सुनावणी त्वरित घेणे शक्य नाही. त्यामुळे ती जानेवारीतच घेतली जाईल, असे स्पष्ट करत त्यांनी 13 जानेवारी हा दिवस घोषित केला. त्या दिवसापासून सुनावणीस प्रारंभ होणे शक्य आहे. या घटनापीठात न्या. पी. एस. नरसिंहा यांचाही समावेश केला जाणार आहे.
निवडणूक आयोगाची सुनावणी लवकरच
शिंदे आणि ठाकरे गटांमधील वादावर केंद्रीय निवडणूक आयोग 12 डिसेंबरला सुनावणी करणार आहे. कोणाची शिवसेना खरी या वादाची उकल निवडणूक आयोगाला करायची आहे. त्याने दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार दोन्ही गटांनी बव्हंशी कागदपत्रे सादर केली आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor