प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे कोणतं सोशल इंजिनिअरिंग करू पाहत आहेत?

सोमवार, 5 डिसेंबर 2022 (18:58 IST)
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आणि बाळासाहेब ठाकरेंकडून, मिळालेला शिवसेनेचा वारसा स्वत:कडेच ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा संघर्ष सुरू झाला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, लोकसभा-विधानसभेचं सभागृह ते दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क, असा या संघर्षासाठी अनेक मैदानांचा मोठा विस्तृत पट आहे. पण यातलं सर्वात मोठं मैदान आहे शिवसैनिकांचं. पक्षासाठी झोकून देणारा भावनाप्रधान शिवसैनिक ज्याचाकडे, शिवसेना त्याची हे सरळ सिद्ध झालेलं गणित आहे.
 
सेनेतल्या अगोदरच्या बंडांमध्येही हे दिसलं आहे. शाखांच्या पसा-यातून जोडला गेलेला शिवसैनिक आपल्याकडेच रहावा यासाठी उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न होत आहेतच. त्याचं एक उदाहरण म्हणजे वाढदिवसानिमित्त मागवलेली प्रतिज्ञापत्रकं. पण याहीपेक्षा काही वेगळे प्रयोग उद्धव ठाकरेंकडून होतांना पहायला मिळत आहेत. अर्थात एक तर त्यांच्या शिवसेनेचा विस्तार, बेस वाढवण्यासाठी हे प्रयत्न असणारच.
 
पण ज्या विचारांशी वा विचारधारांशी सुसंगत अशी सेनेची भूमिका अगोदर नव्हती, अनेकदा ती विरुद्ध होती आणि तेव्हा संघर्षंही झाला, त्या विचारांच्या व्यक्ती आणि संघटनांना उद्धव ठाकरे आपल्यासोबत घेत आहेत असं दिसतंय.
सुषमा अंधारे या दलित आणि आंबेडकरी चळवळीतल्या आक्रमक कार्यकर्त्या जेव्हा 'शिवबंधन' बांधून शिवसेनेच्या उपनेत्या झाल्या तेव्हा मोठी चर्चा झाली.
 
त्यानंतर जेव्हा 'संभाजी ब्रिगेड' सोबत राजकीय आघाडी करण्याचं ठाकरेंनी ठरवलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.
 
या व्यक्ती आणि संघटनेचा शिवसेनेच्या उजव्या विचारधारेच्या हिंदुत्ववादी राजकारणाला पूर्वी विरोध राहिलेला आहे. पण तरीही काही समाज आणि प्रांतांमध्ये पाठिंबा असणा-या या नेत्यांना, संघटनेला सेनेनं सोबत बोलावलं.
 
आता आणखी एक पाऊल पुढे टाकत उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करण्याचं ठरवलं आहे. त्यांच्यात चर्चेच्या फेऱ्यासुद्धा सुरू झाल्या आहेत.
 
यावरुन एक प्रश्न सहाजिक निर्माण होतो, तो म्हणजे उद्धव ठाकरे काय करु पाहत आहेत? बंडामुळे दुबळी झालेली त्यांची शिवसेना बळकट करण्याच्या दबावातून नवीन प्रवेश आणि आघाड्या होत आहेत? की कायम हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या आणि 'जातींचं राजकारण करता येत नाही' अशी टीका झालेल्या शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे काही नवीन प्रयोग करत आहेत?
 
'हे सोशल इंजिनिअरिंग, पण त्याचबरोबर विचारांचा परीघ वाढवण्याचा प्रयत्न'
"आमचं हिंदुत्व जे आहे ते नुसतं शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाही आहे. नुसती घंटा वाजवली म्हणजे हिंदू झालो असं नाही," असं आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणाला उधृत करू म्हणणारे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई लढतांना काही नव सोशल इंजिनिअरिंगही करु पाहत आहेत का?
 
महाराष्ट्रात गेली किमान तीन दशकं राजकारण हे काँग्रेस (आणि नंतर त्यांच्यातून फुटून निर्माण झालेली 'राष्ट्रवादी') विरुद्ध शिवसेना-भाजपा युती असंच फिरतं आहे.
 
या रचनेतूनच लोकसभा-विधानसभेपासून अगदी गावपातळीपर्यंत समीकरणं बनली आणि घट्ट झाली. महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या जातीय समीकरणांनाही याच रचनेनं घट्ट केलं.
 
2014 नंतर परिस्थिती बदलत गेली. भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला. युतीतही गडबड सुरु झाली. 2019 मध्ये उद्धव यांनी कॉंग्रेस-राष्ट्र्वादीसोबत 'महाविकास आघाडी' केल्यावर तर सगळीच समीकरणं उलटी झाली.
आता एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेवरच्या उद्धव यांच्या पकडीला आजवरचं सर्वांत मोठं आव्हान निर्माण झालेलं असतांना उद्धव काही नवी समीकरणं तयार करू पाहत आहेत. त्याला सामाजिक आयामही आहेत.
 
दलित वा आंबेडकरी चळवळ ही शिवसेनेच्या जवळ असल्याचं चित्र नव्हतं. किंबहुना शिवसेनेच्या इतिहासात चळवळविरोधी भूमिका घेतल्याचंही पहायला मिळतं. मग ती विद्यापीठ नामांतराबाबत असो वा मुंबईतला संघर्ष असो.
 
पण सध्याच्या राजकारणात शिवसेना या समूहाच्या जवळ जातांना पहायला मिळते आहे. सुषमा अंधारेंचं शिवसेनेत येणं हे त्याच अंगानं पाहिलं जातं आहे. रिपब्लिकन नेते आणि लेखन अर्जुन डांगळे यांच्या मते सध्या जे हिंदुत्वाचं राजकारण सुरू आहे त्यामुळेच दिसतं आहे.
 
"भाजपाचं हिंदुत्व आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे वेगळं आहे. सेनेचं हिंदुत्व हे बहुजनवादाकडे झुकणारं आहे. त्यामुळे सुषमा अंधारेंसारखा मोठा बहुजनवर्ग हा त्यांच्याकडे आकर्षिला जातो आहे. साहित्यिक, पुरोगामी यांच्यातल्याही अनेकांचा ओढा हा उद्धव यांच्या शिवसेनेकडे आहे. हे सोशल इंजिनिअरिंग आहेच, पण त्याचबरोबर शिवसेनेनं त्यांच्या विचाराची व्यापकता, परीघ जो वाढवला आहे, त्याला प्रतिसाद मिळतो आहे," डांगळे म्हणतात.
 
"उद्धव यांनी विधानसभेत जे भाषण करतांना जे म्हटलं की आमची भूमिका ही शेंडी-जानव्याच्या हिंदुत्वाची नाही ती आंबेडकरी चळवळीतल्या अनेकांना भावली आहे. मुळातच आंबेडकरी चळवळीत भाजपाला विरोध ही भूमिका आहे आणि जर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर शिवसेना हाच पर्याय आहे असं मत झालेलं आहे.
 
आगामी मुंबई महानगरपालिकेत तुम्हाला याचे परिणाम दिसतील. रामदास आठवलेंनी भाजपाला पाठिंबा दिला आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी कोणतीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे जी पोकळी तयार झालेली आहे तिथं भाजपाशी मुकाबला कोण करु शकेल तर शिवसेना आणि उद्धव ठाकरे करु शकतील असं आंबेडकरी जनतेच्या मनात आहे," डांगळे पुढे म्हणतात. पण प्रश्न हा आहे की उद्धव यांनी ठरवून निवडलेला नवा राजकारणाचा मार्ग आहे का?
एक निश्चित की शिवसेनेतल्या फुटीचं गांभीर्य पाहता उद्धव यांना नव्या मित्रांची, नव्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. पण केलेली निवड पाहता त्यातले सामाजिक संदर्भ नजरेआड करता येत नाहीत.
 
संभाजी ब्रिगेड ही मराठा तरुणांची आक्रमक संघटना. त्यांचे आणि शिवसेनेचे अनेकदा वैचारिक भूमिकांवरुन जाहीर वाद आणि रस्त्यावरचे संघर्षही झाले आहेत. मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचे तपशील असोत वा भांडारकर संस्था हल्ला असो वा बाबासाहेब पुरंदरेंना 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार असो अगदी शिवसेना भवनावरचा बाळासाहेबांचा फोटो असो. पण असा संघर्षाचा इतिहास असतांनाही दोघांनी राजकीय आघाडी जाहीर केली.
 
'शिवशक्ती-भीमशक्ती प्रयोग 2000 सालीच केला होता'
आंबेडकरी चळवळीतला एक गट असो वा मराठा समाजाची एक संघटना, उद्धव ठाकरे कोणतं नवं राजकीय-सामाजिक समीकरण जुळवू पाहात आहेत?
 
"शिवशक्ती-भीमशक्ती असा प्रयोग त्यांनी 2000 सालीच केला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरेही स्वत:ही होते," शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगतात.
 
त्यांच्या मते, "पूर्वी पण भीमशक्तीतले अनेक गट आमच्याकडे आले आहेत. संभाजी ब्रिगेडचं म्हणाल तर वेगवेगळ्या प्रकारे भूमिका या अनेक लोकांच्या बदलतात. आधी सुद्धा कर्मठ वा जातीयता मानणारं हिंदुत्व आमचं नव्हतंच.
 
म्हणून शिवसेनेनं सगळ्या जातीधर्माच्या लोकांना गुणवत्तेच्या आधारे पदं दिली आहेत. एक फक्त फरक म्हणता येईल, तो म्हणजे गेल्या दस-याच्या मेळाव्यात उद्धवजी जे म्हणाले होते की काही लोकांचं जे 'नवहिंदुत्व' आहे ज्यात झुंडबळीचं वगैरे समर्थन होतं, त्याला आमचा विरोध आहे. आम्ही 'हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व' या भूमिकेतूनच काम करतो आहे, पण काही लोक हिंदुत्वाच्या नावाखाली तेढ निर्माण करत आहेत."
'मराठा सेवा संघ' आणि 'संभाजी ब्रिगेड'चे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मते हे राजकारणात असे सोशल इंजिनिअरिंग आवश्यक असते.
 
"राजकारणात कितीही नाही म्हटलं तरी सोशल इंजिनिअरिंग हा एक कळीचा आणि आवश्यक मुद्दा राहिला आहे. पण त्यापेक्षाही राजकारणात आपल्याला यश मिळावं या दृष्टीनं काही आडाखे बांधले जातात, वैयक्तिक किंवा सामूहिक पातळीवर असतील, त्यातून अशी एकत्रित येऊन युती होणं होत असतं. सध्याच्या परिस्थितीत संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यात एकमत झालेलं आहे की आपण जर राजकीयदृष्ट्या एकत्र आलो तर पुढच्या कालखंडात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभेपर्यंत आपल्याला यश मिळेल. हा एक उद्धव ठाकरे यांचा आराखडा आहे आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत."
 
पण पूर्वीच्या वैचारिक मतभेदांचं काय? त्यावर खेडेकर म्हणतात की काही इतिहास विसरायचा असतो आणि तसं करुन उद्धव ठाकरे पुढे आले आहेत.
 
"राजकीय युती करत असतांना जो काही इतिहास असतो तो पूर्णपणे विसरून वर्तमानात आणि भविष्यात आराखडा काय आहे ते लक्षात घ्यायचं असतं. त्यामुळे पूर्वी कय झालं हा विचार शिवसेनेनं केला नाही आणि संभाजी ब्रिगेडनंही केला नाही. आजचं सत्य एवढंच आहे की उद्धव ठाकरे सगळं पूर्वीचं विसरून स्वच्छ मनानं एकत्र आलेले आहेत आणि संभाजी ब्रिगेडसोबत राजकीय अंगाने पुढे वाटचाल करत आहेत," खेडेकर म्हणतात.
 
बाळासाहेबांचं आक्रमक हिंदुत्व की प्रबोधनकारांची मांडणी?
शिवसेनेचं आणि विशेषत: उद्धव ठाकरेंचं राजकारण जवळून पाहिलेले राजकीय पत्रकार सचिन परब यांच्या मते उद्धव यांनी शिवसेनेची कमान हाती घेतल्यापासून कायमच असे प्रयोग केले आहेत आणि सेनेचा प्रस्थापित समर्थक वर्ग वाढवायचा प्रयत्न केला आहे.
 
"उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा जो सरधोपट मार्ग आहे तो सोडून व्हॅल्यू ऍडिशन करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. 'शिवशक्ती-भीमशक्ती' ही बाळासाहेब हयात असतांना त्यांनी केलेली गोष्ट आहे. म्हणजे एका प्रकारे सवर्णांचा पक्ष दलितांसोबत नेणं ही त्यातली महत्वाची गोष्ट होती.
 
नंतर त्यांनी 'मी मुंबईकर' हे कॅम्पेन पण केलं. त्याचा अर्थ होता की मराठी माणसांच्या पक्षानं अमराठी माणसांना अपील केलं. ही सगळी पावलं काही प्रमाणात यशस्वी सुद्धा झाली होती.
 
सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतांना शेतकरी आत्महत्यांविषयी त्यांनी एक ग्रामीण भागात यात्रा पण केली होती, सभा घेतल्या होत्या. त्याला प्रतिसाद मिळाला होता. याचा अर्थ असा की प्रत्येक वेळेस उद्धव ठाकरे नवा ऑडियन्स शोधायचा प्रयत्न करतच होते," सचिन परब सांगतात.
 
परब यांच्या मते जे आता अंधारे आणि संभाजी ब्रिगेडमुळे सेनेत होतं आहे, ते पूर्वीही झालं होतं.
"सुषमा अंधारे शिवसेनेत येणं हे जितकं धक्कादायक आहे तितकंच नीलम गो-हे आणि विवेक पंडित पक्षात येणं हेही होतं. उद्धव ठाकरे अशा पद्धतीनं प्रयत्न कायमच करत होते. हे काही आता नवीन दिसतं आहे अशातला भाग नाही.
 
संभाजी ब्रिगेडचा जो समर्थक वर्ग आहे तो आहे दुर्लक्षिला गेलेला, सत्ता नसलेला मराठा वर्ग आहे. तसा वर्ग शिवसेनेकडे फार पूर्वीपासून आहे. राजेश क्षीरसागरपासून ते गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत आणि नारायण राणेपासून ते भावना गवळीपर्यंत हे सगळे याच प्रकारात येतात. असा प्रस्थापित वर्गातून न आलेला मराठा ही शिवसेनेची ताकदच आहे. त्यामुळे सेना आणि संभाजी ब्रिगेडचा ऑडियन्स हा एक असू शकतो. तशा अर्थानं ते दोघे एकत्र येणं हे विरोधाभासी नाही," परब म्हणतात.
 
जरी असे प्रयोग सेनेत यापूर्वी ठाकरेंनी केले असतील तरीही आता ते पुन्हा करण्यामागचा विचार काय असेल? सचिन परब यांच्या मते त्याचं कारण हिंदुत्वाचं राजकारण हे आहे.
 
"जेव्हा उद्धव ठाकरेंना भाजपापासून स्वत:चं अस्तित्व वेगळं करायचं आहे, तेव्हा भाजपाच्या हिंदुत्वापासून स्वत:चं हिंदुत्व वेगळं आहे हे दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर दोन मार्ग होते. एक तर बाळासाहेबांचं अति टोकाचं हिंदुत्व जे अत्यंत आक्रमक आहे.
 
तो उद्धव ठाकरेंचा स्वभाव नसल्यानं ते त्या टोकाला गेले नाहीत. आणि मुळात आणखी किती टोकाला जाणार? म्हणजे मोदींच्या आणखी किती पुढे जाणार? त्यामुळे त्यांच्यापुढे दुसरा पर्याय म्हणजे पॉझिटिव्ह हिंदुत्व. म्हणजे ते म्हणाले तसं की आमचं हिंदुत्व हे 'हृदयात राम आणि हाताला काम' असं आहे. असं करतांना मग स्वाभाविकपणे प्रबोधनकार ठाकरे पुढे येतात," परब म्हणतात.
 
पण या घडामोडींवर बोलतांना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे मत नोंदवतात ते लक्षात घेण्यासारखं आहे. ते सांगतात: "मुद्द्यांवर वा विचाराधिष्ठित राजकारण करणारे जे कार्यकर्ते असतील तर ते आता फुटून गेले त्यांच्यासारखे डळमळत नाहीत. जेव्हा नारायण राणे गेले तेव्हाही साहेब म्हणाले होते की जे नव्यानं आलं ते सगळं टिकलं आणि जे वीस वर्षं राहिले होते, ते गेले. आताही त्यांना अशा नव्या लोकांचाच भरवसा वाटत असावा."
 
प्रश्न आता असा आहे की हे नवं सोशल इंजिनिअरिंग उद्धव यांना असे भरवशाचे नेते आणि कार्यकर्ते मिळवून देतील का?

Published By- Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती