सावरकरांवरून शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडमध्ये जुंपली, ब्रिगेडच्या सभेतच भास्कर जाधवांचे खडेबोल

गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (12:31 IST)
नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेत एक विचित्र तणाव निर्माण झाला.
 
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता.
 
त्यात ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांनी सावरकरांवर टीका केली. त्याला ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उत्तर देत खडे बोल सुनावले.
 
प्रा. गंगाधर बनबरे काय म्हणाले?
राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांपूर्वी विनायक दामोदर सावरकरांवर टीका केली. त्याचे मोठे पडसाद सर्वदूर उमटले. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सावरकरांच्या माफीनाम्याची तुलना शिवाजी महाराजांच्या माफीनाम्याशी केली.
 
"शिवाजी महाराजांनीसुद्धा औरंगजेबाला अशी पत्रं लिहिली होती. मात्र त्यांचे कालखंड वेगळे आहेत. त्यामुळे शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना करू नये असा आमचा उद्देश आहे," असं प्रा. गंगाधर बनबरे म्हणाले.
 
त्यांच्या भाषणात बोलताना ते म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर यांची पुस्तकं आमच्यासमोर आहेत. आम्ही सामाजिक चळवळीत काम करतो. त्यामुळे शिवाजी महाराजांवर मतं आली की आम्हालाही आमची मतं व्यक्त करावी लागतात.
 
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाला बुद्ध धर्म स्वीकारला होता. तेव्हा सावरकरांनी 'बुद्धाचा आततायी हिंसेचा शिरच्छेद' असा एक लेख लिहिला होता. तुमची उडी कुंपणाच्या आतच पडली अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून बाबासाहेब म्हणाले की आता माझ्या अहिसेंची टिंगल करताय, मग पेशव्यांची सत्ता गेली तर ते काय अहिंसक होते का? ते काय पेशव्यांच्या विचाराचे होते का? सावरकर नरक ओकले असं वक्तव्य बाबसाहेबांनी केलं होतं."
 
भास्कर जाधव काय म्हणाले?
प्रा. गंगाधर बनबरे यांच्या या वक्तव्याचा शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी समाचार घेतला.
 
ते म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण जरूर असतील पण त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा आपल्याला विसरता येणार नाही. अंदमानची काय अवस्था आहे ते मी माझ्या डोळ्याने बघून आलो आहे.
 
"तिथली अंधारी कोठडी माझ्यासारख्या माणसाने पाहिली आहे. दोरी वळताना हाताची सालपटं निघालेले मी पाहिले आहेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर सावरकरांवर बोलू शकतात. हा त्यांचा अधिकार आहे. तुमच्या आमच्यांचा नाही. म्हणून तुमची आमची युती असली तरी काही गोष्टींबदद्ल भान ठेवलंच पाहिजे. एकमेकांच्या भावनांचा आदर करावाच लागेल.
 
"तुम्ही माझी शिवसेना प्रमुखांकडे माझी तक्रार करू शकतात. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला हे कदापि मान्य होणार नाही. मी हे खपवून घेणार नाही. तुम्ही आम्ही बाबासाहेब आंबेडकर होऊ नका. असं काही बाबासाहेब आंबेडकर बोलले असतील तर ते त्यांना शोभतं तुम्हा-आम्हाला नाही.
 
त्यामुळे तुमचं स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्द्ल जे मत असेल ते असेल पण एका व्यासपीठावर असताना तुम्हा आमहाला भान ठेवायलाच लागेल."
 
महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर शिवसेना  (उद्धव ठाकरे गट) आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात युती झाली आहे. आता प्रकाश आंबेडकरांशीही त्यांनी युती केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती