सावरकरांच्या जन्मस्थळी कडकडीत बंद

शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (21:11 IST)
नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थळ असलेल्या नाशिकच्या भगूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच, विविध संस्था आणि संघटनांच्यावतीने मोर्चाही काढण्यात आला.
 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांना मदत केली असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत केले. या वक्तव्याचे पडसाद विविध ठिकाणी पडत आहेत. सावरकर यांच्या जन्मस्थळी भगूर येथेही याचे पडसाद उमटले. भगूर बंदचे आवाहन सकाळीच करण्यात आले. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा आणि दुकाने बंद होती. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. कडकडीत बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच, विविध संस्था आणि संघटनांच्यावतीने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करणारा मोर्चा काढण्यात आला. चौकामध्ये आंदोलकांनी निदर्शनेही केली.
 
दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश  दिल्याप्रमाणे नाशिकमधील मनसे कार्यकर्ते थेट शेगाव येथे राहुल गांधींच्या सभेच्या दिशेने रवाना झाले .नाशिकहून २००ह अधिक कार्यकर्ते सामील झाले. रात्रीच त्यांनी शेगावच्या दिशेने कूच केली. मात्र  चिखली पोलिसांनी नाशिकचे मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर तसेच शहर पदाधिकारी नितीन माळी यांच्यासह विविध ठिकाणाहून आलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती