सिल्व्हर ओकवर प्रतिभाकाकींची भेट घेतल्यावर अजित पवार म्हणतात...

शनिवार, 15 जुलै 2023 (20:45 IST)
मागच्या 13 दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणातील समीकरणं अचानक बदलली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजप-सेना सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
या फुटीनंतर शुक्रवारी पहिल्यांदाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी दाखल झाले. कारण होतं काकी प्रतिभा पवार यांची भेट.
 
शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया झालीय. त्यांना भेटण्यासाठीच अजित पवार सिल्वर ओकवर दाखल झाले होते. तब्बल अर्धा तासाच्या भेटीनंतर अजित पवार सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडले.
 
शनिवारी नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांनी हा प्रश्न छेडला आणि अजित पवारांनी उत्तर देताना सांगितल, "काल काकींचं ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे. मला दुपारीच जायचं होतं ऑपरेशन झाल्या झाल्या, परंतु थोडाला विलंब लागला. कारण खातेवाटप जाहीर झाल्याने मी मंत्रालयात होतो, विधानभवनात होतो. अधिवेशन सोमवारपासून असल्यामुळे मला विधानसभा अध्यक्षांशीही बोलायचं होतं."
 
ते पुढे म्हणाले, "मी फोन केला, त्यावेळेस सुप्रिया सुळेंनी सांगितलं की दादा आम्ही आता सिल्व्हर ओकला निघालो आहोत, तर तू तिथेच ये. मला काकींना काहीही करुन भेटायचंच होतं. राजकारण आपल्या जागी, शेवटी आपली भारतीय संस्कृती आहे. कुटुंबाला आपण महत्त्व देतो. पवार कुटुंबीयांची परंपरा आम्हाला आजी-आजोबांनी शिकवली आहे. नंतरच्या पिढीत आई-वडील, काका काकींनी शिकवली आहे. म्हणून अर्धा तास भेटायला गेलो."
 
त्यांनी सांगितलं, "मी काकींची विचारपूस केली, ख्याली खुशाली जाणून घेतली. पुढचे 21 दिवस काळजी घ्यावी लागेल. माझ्या अंतर्मनाने सांगितलं, आपल्याला तिथे गेलं पाहिजे. म्हणून मी तिथे गेलो."
 
पवार साहेब तिथे होते, सुप्रिया तिथे होती, काकी तिथे होत्या, काही अडचण आहे का? असा उलट प्रश्न देखील अजित पवारांनी पत्रकारांना विचारला.
 
लहानपणापासूनच प्रतिभाकाकींनी अजितदादांवर मुलाप्रमाणे माया केल्याचं स्वत: दादांनी जाहीर कार्यक्रमातून सांगितलंय.



Pyblished By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती