अजित पवारांंनी म्हटलं- साहेब निर्णयावर दोन-तीन दिवसांत विचार करतील, पण...

मंगळवार, 2 मे 2023 (20:06 IST)
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून आग्रही आणि आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
शरद पवारांनी सांगितलं की, माझा निर्णय मी घेतला आहे. पण तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन-तीन दिवस द्या, असं म्हणत अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांना आंदोलन बंद करण्याचं आवाहन केलं.
 
“आज सकाळी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. तेव्हा ते असं काही बोलतील याची कल्पना तुम्हाला नव्हती. त्यानंतर तुम्ही आग्रह केला, त्यामुळे पक्षाचे काही नेते सिल्व्हर ओकवर गेले. मी, सुप्रिया, रोहित, भुजबळसाहेब यांच्याशी ते पुन्हा बोलले. आणि त्यांनी तुमच्यासाठी निरोप पाठवला आहे.”
 
“कार्यकर्त्यांनी जर हट्टीपणा सोडला तरच मी माझ्या निर्णयावर विचार करेन, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. आता तुम्ही त्यांच्या विनंतीला मान द्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचं जसं तुम्ही ऐकता, तसं तुम्ही आता त्यांचं ऐका. तुम्ही हट्टीपणा केला, तर मी पण हट्टीच आहे, असं साहेबांनी म्हटलं,” अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
 
'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा मानस आहे,' असं म्हणत शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली.
 
'लोक माझा सांगाती' या शरद पवारांच्या राजकीय आत्मकथेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. नवा अध्यक्ष कोण होणार हे पक्षातील वरिष्ठांनी ठरवावं असंही पवारांनी सांगितलं.
 
गेले काही दिवस राजकीय वर्तुळात अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चर्चा होत असल्याचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली.
 
शरद पवार यांच्या या घोषणेनंतर व्यासपीठावर उपस्थित नेते, तसंच कार्यकर्त्यांमध्ये एकच चलबिचल झाली.
 
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख यांच्यासह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तसंच कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पदावरून पायउतार न होण्याचं आवाहन केलं.
 
मात्र, त्याचवेळी अजित पवार यांनी शरद पवार आपली भूमिका बदलणार नसल्याचं ठामपणे सांगितलं.
 
‘शरद पवार यांच्या निर्णयात अनपेक्षित काहीच नाही’
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
“शरद पवारांसारखे नेते राजकारणातून कधीच निवृत्त होत नाहीत. त्यांचा हा पक्षांतर्गत निर्णय आहे त्यामुळे शिवसेनेनं त्यावर भाष्य करणं योग्य नाही. त्यांच्या नेतृत्वाची देशाला आणि राज्याला गरज आहे. एका पदावरून निवृत्त होणं म्हणजे समाजकारणातून आणि राजकारणातून निवृत्त होणं नाही, त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
 
‘या घटनेत अनपेक्षित असं काही नाही. हा कोणत्या परिस्थिती त्यांनी निर्णय घेतलाय हे तेच स्पष्ट करू शकतात.’
 
यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या राजीनाम्याच्या प्रसंगाचा उल्लेख संजय राऊत यांनी केला.
 
आमचा एकमेकांशी संपर्क आणि संवाद सुरू आहे, महाविकास आघाडीचा आणि राष्ट्रवादीतल्या गोष्टींचा संबंध जोडणं योग्य नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलंय.
 
शरद पवार मोकळे झाल्यानंतर त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू असं राऊत यांनी सांगितलं आहे.
 
पवारांच्या या निर्णयाची कुणकुण प्रतिभाताई आणि सुप्रिया सुळे यांना सुद्धा नसावी, असंसुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय.
 
'देशाचा बुलंद आवाज तरी म्हण'
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणनेनंतर एकीकडे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ सुरू आहे, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पायऱ्यांवर त्यांचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली.
 
या बैठकीनंतर बोलताना छगन भुजबळ तसेच प्रफुल्ल पटेल यांनी आता आम्ही शरद पवार यांच्या भेटीला जात असल्याचं सांगितलं.
 
दिलीप वळसे-पाटील, रोहित पवार हे 'सिल्व्हर ओक'वर दाखल झाले आहेत.
 
तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सेंटर बाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. सुप्रिया सुळेंनी शरद पवार यांना फोन केला आणि स्पीकरवर टाकला. शरद पवारांचा आवाज ऐकवल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना चहापाणी घेण्याची, जेवून घेण्याची विनंती केली.
 
यावेळी कार्यकर्त्यांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली- 'महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार'
 
अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांना लगेचच ऐकवलं- 'देशाचा तरी म्हण ना...'
 
ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई हे सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला 'सिल्व्हर ओक'वर जात आहेत.
 
'साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष घडला तर तुम्हाला का नको?'
दरम्यान, शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार घेण्याचा निर्णय घेतला, याचा अर्थ ते पक्षातून बाहेर पडणार असा होणार नाही. त्यांनी निर्णय घेतला आहे, ते तो बदलणार नाहीत. भावनिक होऊ नका, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला आपलं समर्थन दिलं.
 
कार्यकर्त्यांनी सभागृहात गोंधळ सुरू केला होता. पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. त्याच गोंधळात सगळ्यांच्या भाषणांनंतर अजित पवार बोलायला उभे राहिले.
 
सर्वांत शेवटी अजित पवार यांनी बोलायला सुरूवात केली. पवार राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले.
 
पार्टीचा जो अध्यक्ष होईल, तो पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली काम करेल. साहेब अध्यक्ष असो किंवा नसो, आपला सगळा परिवार असाच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, असं अजित पवार यांनी म्हटलं.
 
अजित पवार यांनी पुढे म्हटलं की, शरद पवार यांनी परवाच म्हटलं होतं की, भाकरी फिरवायची असते. तुम्ही म्हणत आहात की, तुमच्यापासून सुरुवात नको. पण त्यांनी निर्णय घेतला. मी काकींशी बोललो, त्यांनीही म्हटलं की, ते निर्णय बदलणार नाहीत.
 
“साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष शिकत जाईल. आपण त्याला साथ देऊ. आपण जसं आपल्या घरामध्ये वय झाल्यानंतर नवीन लोकांना शिकवत असतो, घडवत असतो. तशा पद्धतीने गोष्टी घडू दे ना. तुम्ही कशाला काळजी करता.”
 
‘काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्यांदेखत नवीन अध्यक्ष तयार झाला, तर तुम्हाला का नको रे?’ असा सवाल अजित पवार यांनी केला.
 
काँग्रेसचं उदाहरण काय देता, काँग्रेसच्या चुकीच्या निर्णयामुळेच आज देशात त्यांच्यावर ही वेळ आली आहे, असं म्हणत कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोरचच अजित पवारांच्या वक्तव्याला विरोध केला.
 
कार्यकर्त्यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांना बोलण्याचा आग्रह केला. मात्र अजित पवार यांनी माइक घेत ‘सुप्रिया, तू बोलू नकोस,’ असं थेट सांगितलं. तिचा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीनं सांगतोय, असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना गप्प राहायला सांगितलं.
 
मात्र काही कार्यकर्त्यांनी आपल्याला दादांचा निर्णय मान्य नसल्याचं म्हटलं.
 
कार्यकर्ते शरद पवारांचं नाव घेऊन घोषणा घेतानाही दिसले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली.
 
"तुम्ही पक्षाचे नेते आहात, तुम्हीच आमची कमिटी आहात. तुम्हाला असं बाजूला होता येणार नाही असं सांगत तुम्ही राजीनामा मागे घ्या", असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
 
‘साहेबांना जेवू द्यायचं का नाही?’
 
अजित पवार यांनी सांगितल्यानंतरही कार्यकर्ते शांत बसायला तयार नव्हते. निर्णय मागे घेतल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिकाच कार्यकर्त्यांनी घेतली.
 
तुम्ही अध्यक्ष राहा आणि कार्याध्यक्ष नेमू, असंही कार्यकर्त्यांनी म्हटलं.
 
प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी माइक घेऊन प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं, “तुम्ही सांगितलं आम्ही ऐकलं. आता साहेबांवर अधिक दबाव नरो, आम्ही पक्षातले वरिष्ठ लोक साहेबांसोबत चर्चा करतो. त्यांचं वय, प्रकृती पाहता त्यांना असा त्रास देणं योग्य आहे का? एवढ्या मोठ्या माणसाशी असं वागू नका, त्यांना जेवू द्यायचं का नाही?”
 
साहेबांना जाऊ द्या, अशी विनंती कार्यकर्त्यांना जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल यांनी केली.
 
मात्र, निर्णय मागे घेतल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.
 
त्याचवेळी सर्वांची सहनशीलता आता संपलेली आहे, साहेबांना जाऊ द्या, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं.
 
अखेरीस शरद पवार बाहेर पडले. मात्र, त्यांच्या गाडीलाही कार्यकर्त्यांनी घेराव घातला.
 
या सगळ्या घडामोडींनंतर ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
 
निवृत्तीच्या भाषणात पवारांनी काय म्हटलं?
शरद पवार यांच्या निवृत्ती भाषणाची लिखित प्रत माध्यमांना देण्यात आली आहे. त्यात पवारांनी म्हटलंय -
 
1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून गेली 24 वर्ष राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील 1 मे 1960 पासून सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास गेली 63 वर्ष अविरत सुरू आहे. त्यापैकी 56 वर्ष मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करतो आहे.
 
संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील 3 वर्ष शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाअधिक लक्ष घालण्यावर भर असेल. याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. सार्वजनिक जीवनातील 1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे.
 
त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा मानस आहे. युवक, युवती आणि विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकुवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहील.
 
अध्यक्षपदाबाबत समिती
आपल्या भाषणात शरद पवारांनी असंही म्हटलं की, “रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठित करावी असं मी सुचवू इच्छितो.”
 
ते म्हणाले, “गेल्या 60 वर्षात महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले हे मी विसरू शकत नाही. परंतु यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे.”
 
त्यांनी या समितीसाठी - प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के.शर्मा, पी.सी.चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसंच फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन – ही नावं सुचवली आहेत.
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती