अजित पवार-राज ठाकरे : दोघांच्या काकांविरुद्धच्या बंडांमध्ये आहेत हे 5 मुलभूत फरक

शनिवार, 8 जुलै 2023 (08:12 IST)
नीलेश धोत्रे
Ajit Panwar Raj Thackeray
Ajit Pawar-Raj Thackeray:  “माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे.”
 
“माझी माझ्या दैवताला विनंती आहे, आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की अजूनपण आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा. विठ्ठलाने आम्हाला द्यावा.”
 
अनुक्रमे राज ठाकरे आणि अजित पवार यांची त्यांचा पक्ष आणि काकांना सोडतानाची ही वाक्य आहेत.
 
काका आणि पुतण्यामध्ये राजकीय वारसहक्कावरून आलेलं वितुष्ट अख्ख्या महाराष्ट्राला काही नवं नाही. ठाकरे काका-पुतणे, मुंडे काका-पुतणे, सातारचे भोसले काका-पुतणे, तटकरे काका-पुतणे, क्षीरसागर, विलंगेकर, देशमुख... अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणात देता येऊ शकतात.
 
पण 2 काका-पुतण्यांची जोडी मात्र सर्वांत जास्त चर्चेत राहिली आहे. त्यांच्या राजकारणाचं सर्वांत जास्त विश्लेषण आणि चिरफाड होते ते म्हणजे ठाकरे आणि पवार काका-पुतणे.
 
1. आमदारांची संख्या आणि पक्षावरची पकड
अजित पवार यांनी पक्ष ताब्यात घेताना त्यांच्याबरोबर 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात त्यांच्याकडे सध्याच्या घडीला 30च्या आसपास आमदारांचा पाठिंबा असल्याचं चित्र आहे. किमानअंशी त्यांच्यासह शपथ घेतलेले 9 आमदार तरी सध्याच्या घडीला त्यांच्या पाठीशी आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असे दोन खासदार त्यांच्याबरोबर आहेत.
 
शिवाय त्यांनी वांद्र्यातल्या एमईटी कॉलेजात घेतलेल्या सभेत कार्यकर्त्यांची बरीच गर्दी दिसून आलेली आहे.
 
पण राज ठाकरे यांची स्थिती मात्र बरोबर याच्यापेक्षा वेगळी होती. गर्दी किंवा कार्यकर्त्यांचा विचार केला तर त्याची कमी आजही राज ठाकरे यांच्याकडे नाही. त्यांनी शिवसेना सोडली तेव्हासुद्धा हजारो कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते. आजही त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते.
 
पण आमदार किंवा खासदारांचा विचार केला तर राज यांनी नवा पक्ष काढताना बाळा नांदगावकर सोडता कुठल्याही शिवसेनेच्या आमदार किंवा खासदारानं त्यांना साथ दिली नाही.
 
एकीकडे बंड करताना अजित पवार यांना मोठ्या प्रमाणात आमदार आणि खासदारांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे, तर राज ठाकरे यांच्यासाठी तो अगदीच नगण्य होता.
 
2. पक्षावरील पकड
शिवसेनेत असताना राज ठाकरे पक्षाचे मुलखमैदानी तोफ आणि स्टार प्रचारक म्हणून ओळखले जात. ते तेव्हा शिवसेनेची तरुणांची शाखा असलेल्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षदेखील होते.
 
प्रत्यक्षात तिकिट वाटप, महत्त्वाचे निर्णय आणि पक्ष संघटनेवर मात्र त्यांची पुरेशी पकड नव्हती. त्यावेळी तिथं बाळासाहेब ठाकरे यांचा एकछत्री अंमल होता.
 
जिल्ह्या जिल्ह्यात विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राज यांचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क होतं खरं पण ते तेवढ्यापुरतीच मर्यादित होतं. ते प्रत्यक्ष शिवसेनेतल्या संघटनेत मात्र नव्हतं.
 
त्यामुळे राज यांच्या मनसेतसुद्धा त्याच विद्यार्थी सेनेतल्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. मुख्य शिवसेनेचे कार्यकर्त्या त्यापासून दूरच राहिले.
 
पण, अजित पवार यांची गोष्ट मात्र वेगळी आहे. शरद पवार यांच्याबरोबरीनेच अजित पवार यांची पक्ष संघटनेवर मजबूत पकड आहे.
 
तिकिट वाटप, महत्त्वाचे निर्णय आणि प्रशासनावर अजित पवार यांची पकड आहे. त्यामुळेच त्यांच्या मागे आमदार, खासदार आणि कार्यकर्ते जाताना दिसत आहेत.
 
परिणामी अजित पवार यांच्या मागे सध्या प्रदेश पक्ष कार्यालयातील कर्मचारीसुद्धा उभे असल्याचं चित्र आहे. निवडक एक-दोन कार्यकर्ते किंवा कर्मचारी सोडले तर सर्वजण अजित पवार यांच्या मागे उभे राहिले आहेत.
 
3. वेगळा पक्ष आणि पक्षावरच दावा
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना शिवसेनेवर दावा केला नाही. त्यानी महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष नावाचा नवा पक्ष स्थापन केलाय.
 
तर अजित पवार यांनी मात्र थेट राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा ठोकला आहे.
 
4. थेट सत्तेत आणि कायम विरोधातच
बंड करत बाहेर पडताना अजित पवार थेट सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या इतर 8 सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
 
दुसरीकडे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून कायम विरोधी पक्षातच आहेत. गेल्या 15 वर्षांमध्ये त्यांच्या पक्षाला एकदाही सत्तेत सहभागी होण्याची संधी आलेली नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या सलग 2 निवडणुका त्यांच्या पक्षाला एकापेक्षा जास्त आमदार निवडून आणता आलेला नाही.
 
पण या पेक्षाही सर्वांत महत्त्वाचा आणि मुलभूत फरक राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या राजकारणात आहे तो म्हणजे त्यांच्या राजकारणाच्या पोताचा.
 
5. राजकारणाचा पोतच वेगळा
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे बीबीसी मराठीशी बोलताना तो विस्तृत करून सांगतात,
 
“राज ठाकरे करिष्मा वारशाने मिळाल्याच्या पद्धतीने राजकारण करत होते. पण अजित पवाराचं मात्र तसं राजकारण करत होते, असं कुणाला बोलता येणार नाही. त्यांनी खूप छोट्या स्तरापासून राजकारणाला सुरुवात केली आहे. अगदी जिल्हा बँकेच्या स्तरापासून.
 
राज ठाकरे स्वतःला केद्रस्थानी ठेवून राजाच्या पद्धतीने राजकारण हाकतात, या उलट अजित पवार मात्र फस्ट अमंग्स इक्वल वागतात. ते त्यांच्या इतर समवयस्क नेत्यांचा आब राखतात.”
 
राजेंद्र साठे पुढे सांगतात,
 
“एकादृष्टीने राज ठाकरे यांचं राजकारण हे संरजामी पद्धतीचं आहे. 1960 नंतर महाराष्ट्रामध्ये जी कृषीऔद्योगिक व्यवस्था उदयाला आलेली आहे, तिच्या संस्थात्मक राजकारणाचं बाळकडू अजित पवार यांना मिळालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचं राजकारण हे यातून निर्माण झालेल्या व्यवस्थेचं आणि कार्यकर्त्याचं आहे.
 
राज ठाकरेंना संस्था, जाती आणि महाराष्ट्र माहिती नाही. त्याउलट अजित पवारांचं आहे. त्यांना या सर्व गोष्टी ज्ञात आहेत. त्यामुळेच राज ठाकरे यांना पक्ष संघटना फारशी उभी करता आली नाही. अजित पावर याचं मात्र तसं होणार नाही,” असं साठे यांना वाटतं.
 
राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या बंडाचं विश्लेषण करताना सांगतात.
 
“अजित पवार यांचं बंड राज ठाकरे यांच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून घालमेल होती. त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद पाहिजे होतं. पुढे सरकार आलं तरी शरद पवार ते त्यांना देणार नाहीत. याची त्यांना कुणकुण लागली होती. म्हणून त्यांनी बंड केलं. राज ठाकरेंचं तसं नव्हतं.
 
राज ठाकरेंना पक्ष फोडता आला नाही, त्याउलट अजित पवार संघटनेतल्या प्रत्येक गोष्टीत सक्रिय होते. अजित पवार कसलेले राजकारणी आहेत. सतत लोकांसाठी उपलब्ध असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा दोघांमधला मुलभूत फरक आहे.”
 
आता या दोन्ही पुतण्यांच्या बंडातली साम्यस्थळं पाहूयात.
 
भावंडाच्या बढतीला विरोध
दोघांनी बाहेर पडताना त्यांच्या विठ्ठलाचा उल्लेख केला आहे. पण प्रत्यक्षात त्यांचा विरोध त्यांच्या भाऊ किंवा बहिणीच्या बढतीला असल्याचं दिसून आलं आहे.
 
राज ठाकरे यांचा थेट विरोध उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या हातात शिवसेना जाण्याला होता.
 
तर अजित पवार यांचा विरोध त्यांची बहिण सुप्रिया सुळे यांना आणि त्यांच्या हातात जाणाऱ्या पक्षाला असल्याचं दिसून येत आहे.
 
सुप्रिया सुळेंकडे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्राचं प्रभारीपद आल्यानंतरच अजित पवार यांचं बंड तातडीनं उफाळून आलं आहे ते विसरून चालता कामा नये.
 
अर्थात या अजित पवार यांच्या या बंडाला अनेक वर्षांची पार्श्वभूमी आहे. त्याबद्दलच्या सविस्तर लेखाची लिंक खाली देण्यात आली आहे.
 
पक्षात योग्य स्थान न मिळाल्याचा दावा
शिवसेनेत ऐकलं जात नव्हतं तसंच योग्य स्थान मिळत नव्हतं, असं राज ठाकरे यांनी पक्ष सोडल्यानंतर अनेकदा सांगितलं आहे.
 
तसं पाहता अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर पुरेसा अंमल आहे तरीसुद्धा वरिष्ठ आशीर्वाद देत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
 
थोडक्यात, अजित पवार आणि राज ठाकरे यांना जे स्थान त्यांच्या वरिष्ठांकडून पक्षात अपेक्षित आहे किंवा होतं ते नाकारण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.
 
विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप
तर “माझी माझ्या दैवताला विनंती आहे, आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की अजूनपण आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा. विठ्ठलाने आम्हाला द्यावा, असं अजित पवार म्हणाले आहेत.
 
शरद पवार यांच्याबद्दल आजही आमच्या मनात प्रेम आहे. ते आमचे विठ्ठल आहेत. पण विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. त्यामुळे साहेब तुम्ही बडव्यांना दूर करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या', अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी भावना व्यक्त केल्या.
 
अर्थात यामध्ये छगन भुजबळ यांना अभिप्रेत असलेला आशीर्वाद अजित पवार यांना हवा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती