याबाबत अधिक माहिती अशी की ,गुरुवारी दुपारी मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन पोलिसांकडे आल्याने सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली होती दरम्यान फोन करणार व्यक्ति हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी असून परीक्षेसंबंधी सूचना करण्यासाठी त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते. मात्र, संपर्क करून दिला जात नसल्याने त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
दरम्यान फोन केला तेव्हा त्याने मद्यपान केलेले होते का? याची चौकशी सुरू आहे. तर बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे (वय ३४ रा. हसनापूर, ता. शेवगाव) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी पोलिसांच्या ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर फोन आला. फोन करणाऱ्याने आपले नाव न सांगता मला मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या, अन्यथा मंत्रालय बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी त्याने दिली.
ही माहिती मंत्रालयाचा सुरक्षा विभाग आणि मुंबई पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी मंत्रालयात तपासणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. तोपर्यंत हा फोन नगर जिल्ह्यातून आल्याचे आढळून आल्याने फोन करणाऱ्या व्यक्तीला शोधण्याची जबाबदारी नगर पोलिसांवर सोपविण्यात आली. पोलिसांनी तातडीने हसनापूर गाठले. तेथून फोन करणाऱ्या बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे याला ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याचे आढळून आले. स्पर्धा परीक्षा पारदर्शक व्हावी, ही मागणी मुख्यमंत्र्याकडे करायची आहे. त्यासाठी त्यांच्याशी बोलायचे होते. मात्र, बोलून दिले जात नव्हते, त्यामुळे हा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्याचे समजते. त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. मुंबई पोलिसांकडूनही त्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.